आरटीओ कार्यालये सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार
यवतमाळ, दि. 17 : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून नागरीकांना त्याचा ताबा मिळावा, यासाठी मार्च महिन्यातील सर्व सुट्टीच्या दिवशी उपप्रादेशीक परिवहन अधिकारी यांचे कार्यालय सुरू राहणार आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वाहनाची खरेदी होणार असल्याने त्या अनुषंगाने महसूल वसुली, उद्दिष्ट पुर्तता करणे यासाठी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये दि. 19, 25, 26 आणि 28 मार्च रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहे. या दिवशी वाहन  नोंदणी, तसेच कर वसुलीचे कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे. या कामासाठी आवश्यक असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
00000
नेर येथे युवा संसद, विकास कार्यक्रम
यवतमाळ, दि. 17 : नेहरू युवा केंद्रातर्फे नेर येथे रविवारी, दि. 12 मार्च रोजी तालुकास्तरीय शेजार युवा संसद आणि विकास कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी यवतमाळचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख, संतोष अरसोड, प्रशांत ठाकरे, हरिश्चंद्र राठोड, नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेंगे आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख यांनी युवा मंडळाच्या माध्यमातून युवकांच्या कलागुणांना वाव देण्यात येत आहे. गावाच्या विकासासोबतच स्वत:चाही विकास साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. श्री. राठोड यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वत:चा बचाव करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती दिली. श्री. ढेंगे यांनी युवा केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. श्री. अरसोड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात युवकांना आदर्श सांसद ग्राम योजना, स्वच्छ भारत मिशन, बेटी बचाओ, बेटी पढाओ, सिंचन व्यवस्था आदींबाबत माहिती देण्यात आली. तसेच यावेळी युवकांना त्यांच्या गावात असलेल्या समस्यांची माहिती देण्यात आली. या समस्या सोडविण्याबाबत चर्चा करण्यात आली. गावाच्या विकासासाठी संघटीत होण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात नेर येथे टीडीआरएफ शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
00000
आज जलजागृती सप्ताहानिमित्त राळेगाव येथे कार्यशाळा
यवतमाळ, दि. 17 : यवतमाळ पाटबंधारे मंडळ, यवतमाळ आणि यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ यांच्यातर्फे जलजागृती सप्ताहामध्ये शनिवारी, दि.18 मार्च रोजी सकाळी 10.00 वाजता राळेगाव येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
राळेगाव येथील शेतकरी निवास कृषि उत्पन्न बाजार समिती येथे कळंब, राळेगाव, नेर, दारव्हा, दिग्रस तहसिलमधील प्रकल्पांवरील पाणीवापर संस्थेचे पदाधिकारी आणि लाभधारकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार शंकर अमीलकंठवार, कृषि तज्‍ज्ञ डॉ. सी. यू. पाटील आणि यवतमाळ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. कुंभारे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
सोमवारी महिला लोकशाही दिन
यवतमाळ, दि. 17 : जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिन सोमवारी, दि. 20 मार्च रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे हा महिला लोकशाही दिन  ण्‍होईल. तक्रारदारांनी आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.
00000
जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
यवतमाळ, दि. 17 : स्वयंप्रेरणेने ग्रामीण भागात समाजकार्य, विकास कार्य करणाऱ्या ग्रामीण युवा मंडळांकडून सन 2016-17 च्या जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी 20 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन नेहरू युवा केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा युवा पुरस्कार निवडीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावामधून एकाच युवा मंडळाची निवड केली जाते. पुरस्कारासाठी निवड झालेल्या मंडळाला 25 हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारकडून प्रदान करण्यात येते.
जिल्ह्यातील नोंदणीकृत आणि नेहरू युवा केंद्राशी संलग्न असलेल्या तसेच धर्मदाय आयुक्त कार्यालयाद्वारा नोंदणीकृत असलेले युवा मंडळ प्रस्ताव सादर करण्यास पात्र असतील. प्रस्ताव सादर करणाऱ्या युवक व महिला मंडळांनी सन 2015-16 मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पर्यावरण संवर्धन, व्यवसाय प्रशिक्षण, साक्षरता, महिला सक्षमीकरण, लोककला आणि क्रीडा, रोजगार निर्मिती, श्रमदान, सामाजिक समस्याबद्दल जनजागृती मोहिम, समाजकल्याण, स्वच्छता अभियान इत्यादी  क्षेत्रात सक्रीय कार्य केलेले असावे. विहित नमुना आणि अधिक माहिती नेहरु युवा केंद्राच्या कार्यालयात उपलब्ध आहे. इच्छुकांनी आपले अर्ज दिनांक 20 मार्चपर्यंत जिल्हा युवा समन्वयक, नेहरू युवा केंद्र, चंदननगर, प्रजापती नगर जवळ, वडगाव रोड, यवतमाळ येथे सादर करावे, असे नेहरू युवा केंद्रातर्फे कळविण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी