उर्वरीत आधार नोंदणी तात्काळ पूर्ण करा
- जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
*आधार नोंदणीच्या कामाचा आढावा
*शालेय विद्यार्थी, बालकांच्या नोंदणीला प्राधान्य
यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यातील प्रत्येक पुरूषमहिलाविद्यार्थीबालकाची आधार नोंदणी करणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसातील सातत्याच्या पाठपुराव्याने नोंदणीचे काम चांगल्यापैकी झाले असून उर्वरीत नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांना आधार नोंदणीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मरसाळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्चना इंगोले, ई-डिस्ट्रीक्ट प्रोजेक्टचे जिल्हा मॅनेजर उमेश घुग्‍गुसकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांसह अंगणवाडीतील विद्यार्थी, बालकांची नोंदणी प्राधान्याने करावयाची आहे. त्यामुळे विशेष पथके लावून या बालकांची आधार नोंदणी पंधरा दिवसात पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले. शाळा व अंगणवाडीचा तालुकानिहाय नोंदणीचा आढावाही त्यांनी घेतला. आधार नोंदणीच्या कामाला गती देण्यासाठी स्वतंत्र व्हॅाट्सअप ग्रुप करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार 29 लाख 32 हजार 396 आधार नोंदणी करावयाचे होते. त्यापैकी दिनांक 27 मार्चपर्यंत 27 लाख 69 हजार 446 इतक्या लोकांची आधार नोंदणी पूर्ण झालेली आहे. आधार नोंदणीची टक्केवारी 94.44 इतकी आहे. आता केवळ 5.56 टक्के नोंदणी शिल्लक असून सदर नोंदणी विशेष मोहिम राबवून पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
तर केंद्राची नोंदणी रद्द करा
            आधार नोंदणीचे काम करणाऱ्या केंद्रानी गतीने आणि निर्धारीत पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. सदर केंद्र कामात हयगय करीत असल्यास किंवा केंद्रांकडून समाधानधारक काम होत नसल्यास त्यांची नोंदणी रद्द करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. यापूर्वी काही केंद्रांची नोंदणी रद्द करण्यात आली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
00000
केबल ऑपरेटर निवडीसाठी शनिवारी अमरावतीत सोडत
यवतमाळ, दि. 30 : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात केबल जोडणीच्या संदर्भात विनाक्रम (रॅन्डम) सर्वेक्षण करण्याकरीता केबल ऑपरेटर आणि बहुविध यंत्रणा परिचालकाची निवड शनिवारी, दि. 1 एप्रिल रोजी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृह क्रमांक 1 येथे दुपारी 12.30 वाजता काढण्यात येणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी सोडत काढून तीन केबल ऑपरेटर व एक बहुविध यंत्रणा परिचालकाची निवड करण्यात येणार आहे. सोडतीकरीता जिल्ह्यातील सर्व केबल ऑपरेटर आणि बहुविध यंत्रणा परिचालकांनी उपस्थित रहावे, असे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
00000
सोमवारी लोकशाही दिन
यवतमाळ, दि. 30 : एप्रिल महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी, दि. 3 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी सकाळी 10 वाजता आपले अर्ज दाखल करावेत, तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्जाचे निरसण झालेले नसल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करावे, तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज केल्याची पोच यावेळी सादर करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000

लैंगिक अत्याचाराला वेळीच पायबंद घाला
- महिला आयोग सदस्य निता ठाकरे
यवतमाळ, दि. 30 लैंगिक अत्याचाराच्या घटना पोलिसांत गेल्यानंतर बदनामी होईल, या हेतुने समोर येत नाही. आज एखादी घटना छोटी किंवा प्राथमिक स्वरूपाची वाटत असेल, आज तिला पायबंद घतला नाही, तर ती घटना गंभीर स्वरूपाची होऊ शकते, यासाठी लैंगिक अत्याचाराला वेळीच पायबंद घाला, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या सदस्य निता ठाकरे यांनी केले.
येथील कोल्हे सभागृहात राज्य महिला आयोग, जिल्हा महिला व बाल विकस अधिकारी कार्यालयाच्या वतीने लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण 2013 अंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. श्रीमती ठाकरे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हा सरकारी वकील निती दवे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्चना इंगोले
श्रीमती ठाकरे म्हणाल्या, महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेकविध कायदे आहेत. कायदे हे महिलांच्या सबलीकरणासाठी आहे. महिलांना जोपर्यंत पूर्णपणे संरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. कायद्याच्या परिपूर्ण वापर होण्यासाठी महिलांमध्ये जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे.
श्रीमती चौधरी यांनी महिलांवर होणारे लैंगिक हिंसाचार ही संपूर्ण देशासमोरील समस्या आहे. शिक्षित, अशिक्षित, ग्रामीण या सर्व महिलांशी निगडीत ही समस्या आहे. अशा अत्याचाराला वेळीच प्रतिबंध पडणे गरजेचे असल्याचे सांगितले. श्रीमती दवे यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने प्रामाणिक प्रयत्न सुरू केले आहे. महिलांच्या संरक्षणासाठी कायदे करण्यात आले आहे. खोट्या तक्रारी करून महिलांनी स्त्रित्वाचा गैरवापर करू नये, महिलांनी कायद्याचा उद्देश आणि भूमिका लक्षात घेऊन कुटुंब व्यवस्था कायम टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी कायद्याच्या विविध कलमांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.
श्रीमती इंगोले यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचे महत्व सांगितले. कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून वैशली केळकर, प्रतिभा गजभिये यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रवी आडे यांनी सूत्रसंचालन केले. संरक्षण अधिकारी प्रिती शेलोकार यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी वरीष्ठ संरक्षण अधिकारी कविता राठोड, विधी सल्लागार श्री. गौतम, परिविक्षा अधिकारी जी. आर. ठाकरे, समुपदेशक प्रशांत विघ्ने, तालुका संरक्षण अधिकारी श्री. विनकरे, श्री. वानोळे, श्री. राठोड, श्री. गोमासे, श्री. मडकवाडे, श्री. देवपारे, श्री. जायभाये, श्री. सोमवटकर, सुनील हरगुडे यांनी सहकार्य केले.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी