स्वाभीमान योजनेसाठी शेतजमीन खरेदी
*लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 9 : पुसद येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी यांच्यातर्फे स्वाभीमान योजनेसाठी शासनाच्या दरानुसार शेतजमीन विक्री करणारे आणि योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुसद कार्यालयाच्या अंतर्गत पुसद, उमरखेड, दारव्हा, दिग्रस, नेर, आर्णी, महागाव असे सात तालुके आहेत. या क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या आदिवासी भूमिहिन दारिद्र्य रेषेखालील विधवा, परितक्त्या, पीटीजी कुटुंबे, भूमिहिन झालेली प्रकल्पस्तरावरील कुटुंबाकरीता भूमिहिन दारिद्र्य रेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभीमान योजनेंतर्गत चार एकर जिरायत किंवा दोन एकर बागायत जमीन 50 टक्के बिनव्याजी कर्ज आणि 50 टक्के अनुदान या तत्वावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्यांना शासनाच्या दरानुसार शेतजमीन विक्री करावयाची आहे अशांनी आणि योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांची प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद, जि. यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
उन्हापासून करा आरोग्याचे संरक्षण
* आरोग्य विभागाच्या सूचना
*प्रतिबंधात्मक उपाय करावेत
यवतमाळ, दि. 9 : राज्यात जास्त ऊन तापणाऱ्या जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचाही समावेश आहे. दरवर्षी जिल्ह्यातील पुसद, वणी आदी तालुक्यातील तापमान अधिक असते. त्यामुळे उष्णतेत अधिक वाढ होवून ऊन लागणे किंवा उष्माघात होण्याचे प्रमाण वाढते. उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाने योग्य काळजी घेतल्यास उष्माघातापासून बचाव होवू शकणार आहे, त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून आरोग्याचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.
उन्हाळ्यामध्ये शेतीमध्ये अथवा इतर मजूरीचे कामे उन्हात फार वेळ करणे, कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्याचा वापर करणे, प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येणे, ही उष्माघात किंवा ऊन लागण्याची सर्वसाधारण कारणे आहेत.
उष्माघातामध्ये त्वचा कोरडी पडणे, ताप येणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी आणि अस्वस्थता, बेशुध्दावस्था आदी लक्षणे आढळून येतात. उष्माघातात वाढत्या तापमानात जास्त कष्टाची कामे करणे टाळावे, उन्हाळ्याच्या दिवसात पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे व सैल कपडे वापरावे, शक्यतो उन्हात जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, उन्हात घराबाहेर निघतांना डोक्यावर टोपी, रुमाल बांधावा. डोळ्यावर गॉगल्स वापरावा, ऊन लागल्यास निंबू शरबत, कैरीचे पन्हे किंवा साखर पाणी भरपूर प्रमाणात प्यावे. थंड पाण्याने संपूर्ण अंग पुसून काढावे. श्रमिक वर्गाने शक्यतोवर दुपारच्या आत त्यांची कामे आटोपून घ्यावी, विशेषत: लहान मुले आणि वयोवृध्द नागरिकांनी उन्हात जाणे टाळावे, हे प्रतिबंधात्मक उपाय योजावेत.
उष्माघाताची लक्षणे दिसून आल्यास जवळच्या आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद यवतमाळ यांनी केले आहे.
00000
लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी उपायोजना
यवतमाळ, दि. 9 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा रविवारी, दि. 12 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे.
लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील कॉपी, गैरप्रकारांची गंभीरपणे दखल घेण्यात आली आहे. असे प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गन्हे दाखल करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहे. तसेच या परीक्षेसाठी आयोगाने कडक उपाययोजना केल्या आहे. यात परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची पोलिस कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक आणि भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. या परीक्षेवर जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत.
00000
एड्सबद्दल युवकांनी जागरूकता पाळावी
-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे
यवतमाळ, दि. 9 : एचआयव्हीग्रस्त व्यक्तीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे युवकांनी एड्सबद्दल जागरूता पाळावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे यांनी केले.
एचआयव्ही जंतूची लागण लैंगिक संसर्गाने होते. पुढे या रोगाचा वेळीच उपचार केला नसल्यास त्याचे एड्स्‍ या रोगामध्ये रूपांतर होते असुरक्षित लैंगिक संबंध, दुषित रक्त वापरणे, निरजंतुकीकरण केले नसलेल्या सुईच्या माध्यमातून, गरोदर मातेकडून होणाऱ्या बाळाला रक्त आणि दुधाच्या माध्यमातून एचआयव्ही संसर्ग होतो. या रोगाचा संसर्ग झाल्यानंतर पहिल्या 90 दिवसात elisa test निगेटीव्ह राहण्याची शक्यता असते. ज्या रूग्णांची एचआयव्ही बाधीत असते, अशा रूग्णांची तीन विविध पद्धतीने रक्तचाचणी केली जाते. या तीन चाचणीमध्ये बाधीत रिपोर्ट असल्यास एचआयव्हीग्रस्त असे म्हटले जाते. एचआयव्हीची तपासणी करण्यासाठी नागरीकांनी जवळच्या शासकीय रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात येते. तसेच संशयीत वागणूक असणाऱ्यांनी स्वत: चाचणी करावी, तसेच ज्यांना वजन कमी होणे किंवा मुळ वजनात 10 टक्क्यांनी घट होणे, एका महिन्याहून अधिक काळ खोकला किंवा जुलाब होणे, सतत येणारा ताप, घशात पुरळ येणे, अंगावर खाज येणे, औषध उपचार येऊनही बरा न होणे ही लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तींनी तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात एचआयव्हीची तपासणी करून घ्यावी. ही चाचणी आरोग्य केंद्रात मोफत केली जाते.
हा आजार होऊ नये यासाठी काळजी म्हणजे एक पती व पत्नी निष्ठा, निरोधाचा वापर करणे, सुरक्षित शारीरिक संबंध, रक्त घेत असताना रक्तपेढीतून तपासलेलेच रक्त घ्यावे आणि गरोदर असल्यास सरकारी दवाखान्यात जाऊन वेळोवेळी तपासण्या कराव्यात. एचआयव्ही रूग्णांची संख्या देशात वाढू नये, यासाठी प्रत्येक व्यक्तीने काळजी घ्यावी. एचआयव्हीची लागण झाली असल्यास पुरक असा आहार रोजच्या जेवणात घ्यावा, ज्यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. एड्सची लक्षणे आढळल्यास नागरीकांनी स्वत: तपासणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे यांनी केले. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक, सामान्य रूग्णालय, यवतमाळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
महिला अधिक धैर्यवान, शक्तीमान
-जिल्हा न्यायाधीश पी. एस. खुणे
यवतमाळ, दि. 9 : कायदा हा महिलांच्या बाजूने असतो, असे म्हणणे चुकीचे आहे. कायदा हा केवळ महिलांच्या जन्मजात मानवाधिकाराची परिभाषा करून त्या हक्काचे संरक्षण करतो. त्यामुळे कायदे केवळ दुर्बलांसाठी असतात असे नाही. महिला या अधिक धैर्यवान आणि शक्तीमान आहेत, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश पी. एस. खुणे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय आणि शासकीय निवासी तंत्र निकेतनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंत्रनिकेतनचे प्राचार्य श्री. मोगरे होते.
श्री. खुणे म्हणाले, कायदा कुणाच्याही विरोधात किंवा बाजूने नसतो. महिलांसाठी असलेले कायदे विशेष महिलांना मानव म्हणून सन्मानपूर्वक जीवन जगता यावे, तसेच महिलांच्या संरक्षण व पालनपोषणासाठी जबाबदार घटकांना त्यांच्या कर्तव्याची आणि कर्तव्यात कसूर केल्यास होऊ शकणाऱ्या कायदेशीर परिणामांची जाणीव करून देते. महिला आणि पुरूषांची तुलना होऊच शकत नाही. नोकरी किंवा इतर कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिला घरातील जबाबदारी चोख बजावितात. हे पुरूषांना शक्य होत नाही. त्यामुळे अवलंबिततेच्या बाबतीत पुरूषच स्त्रियांवर अधिक अवलंबून असतात. महिलांचा विकास म्हणजे पूर्ण कुटुंब आणि राष्ट्राचा विकास असतो. ज्या देशांमध्ये महिलांचा सामाजिक सहभाग असतो, ते देश जास्त प्रगत असतात.
ॲड. निलिमा जोशी यांनी महिलांसाठी असलेले विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन केले. ॲड. विजया घाडगे-चौधरी यांनी गर्भलिंग परिक्षण विरोधी कायद्याची माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक बी. एम. बेतवार यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती प्रा. एस. एस. कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रा. बुरबुरे, श्रीमती कांबळे यांनी पुढाकार घेतला.
00000


महारेशीम अभियानास सुरवात
यवतमाळ, दि. 9 : जिल्हा रेशीम कार्यालयाच्या महारेशीम अभियानास गुरूवारी, दि. 9 मार्च रोजी सुरवात करण्यात आली. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात या अभियानास सुरवात करण्यात आली.
यावेळी बाभुळगावचे तहसिलदार श्री. झाडे, तालुका कृषि अधिकारी श्री. खडसे, रेशीम विकास अधिकारी श्री. चौगुले आदी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी यांनी संवाद साधला. त्यांनी रेशीम शेतीमधून मिळणाऱ्या उत्पादनाविषयी माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी यांनी रेशीम शेती आणि रेशीम उद्योग यशस्वीरित्या राबविण्यासाठी आणि अभियानासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास समुह प्रमुख श्री. बावगे, श्री. नरवाडे, श्री. बावणे, श्री. बजवे, श्रीमती बन्सोड, श्रीमती देठे, श्रीमती मुकुर्णे, बार्टीच्या मनिषा खंडाळकर, शितल घावडे, मेघा पाटील, ज्योती भाटे, प्रगतीशील शेतकरी श्री. राठोड, शशीकांत देशमुख उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी