दोन वर्षात राज्यात 1500 मेगावॅट सौरउर्जा निर्मितीचे उद्दिष्ट - पालकमंत्री मदन येरावार

वेदधारिणी विद्यालयात सोलर रुफ टफचे उद्घाटन
यवतमाळ, दि. 21 : सद्यस्थितीत जगाला ग्लोबल वॉर्मिंगची समस्या भेडसावत आहे. दिवसेंदिवस पृथ्वीचे तापमान वाढत आहे. कोळशापासून होणा-या वीज निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होते. तसेच हवेच्या माध्यमातून हे कण आपल्या शरीरात जातात. परिणामी नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे सरकार, सामाजिक संघटना आदींच्या माध्यमातून प्रदुषण निर्मुलनासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. सौरउर्जा हा त्यावर एक चांगला उपाय आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात राज्यात 1500 मेगावॅट सौरउर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
पिंपळगाव येथील वेदधारिणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे सौर उर्जेवर आधारीत वीज निर्मिती संचाचे (सोलर रुफ टफ) उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका ॲड. करुणा तेलंग होत्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नीरज डफळे, विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाळे, उपाध्यक्ष विनोद संगीतराव, मनिष दुबे, मुकुंद महाजन उपस्थित होते.
चांगले उपक्रम राबविण्यात वेदधारिणी विद्यालय नेहमी अग्रेसर राहिली आहे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, डिजीटल होणारी ही पहिली मराठी शाळा आहे. देशात लाईट, फॅन, वातानुकुलीत जेथे तयार होते, तेथील जनतेची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आरोग्याच्या समस्यांना त्यांना नेहमी सामारे जावे लागते. तसेच कोळशापासून होणा-या वीज निर्मितीमुळे आपल्यालाही प्रदुषणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच सौर उर्जेला सरकारने प्राधान्य दिले आहे. याच सरकारच्या काळात सोलर रुफ टफ योजना अमलात आली. या अंतर्गत मेडाच्या माध्यमातून 30 टक्के अनुदान दिले जाते. वेदधारिणी शाळेने दोन किलोवॅटचे युनीट शाळेत लावले आहे, हे अभिनंदनीय आहे.
शेतक-यांना नियमित वीज मिळावी म्हणून जिल्ह्यात कोळंबीजवळ मांजर्डा येथे फीडर लावण्यात आले आहे. सर्व क्षेत्रात सौर उर्जेचा वापर जास्तीत जास्त व्हावा, या दृष्टीने सन 2019-20 पर्यंत राज्यात 1500 मेगावॅट सौर उर्जा निर्मितीचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजना सौर उर्जेवर घेण्यात येणार आहे. विदर्भ – मराठवाडा येथे सौर उर्जा प्रकल्प घेणे गरजेचे असून त्यासाठी जनतेने समोर आले पाहिजे. मेडाचे अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. वेदधारिणी शाळेने सरकारच्या प्राधान्यावर असलेले डिजीटल शाळा, सौरउर्जा, स्वच्छता आदी उपक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे राबविले आहे. त्यासाठी शाळेचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. इतरही शाळांनी अशी प्रगती करावी. येथील विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत घेऊन स्वत:चे, शाळेचे, समाजाचे आणि जिल्ह्याचे नाव मोठे करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
वेदधारिणी विद्यालय येथे सद्-गुरू सोलर सिस्टीम यांच्याकडून 2 किलोवॅटचे सोलर रुफ टफ आणि आयसोलेटरसोबत 3 किलोवॅटचे सोलर इनव्हर्टर लावण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक नीरज डफळे यांनी तर संचालन गौरव दरणे यांनी केले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
                                                            000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी