“गाव तेथे वाचनालय” संकल्पना राबाविणार - पालकमंत्री येरावार

Ø नगर भवनात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन


यवतमाळ, दि. 25 : आजकाल वाचन संस्कृती कमी झाली आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी वाचन आवश्यक असून त्याला दुसरा कोणताच पर्याय नाही. ग्रंथ आणि पुस्तक हे ज्ञान संपादनाचे सर्वात मोठे साधन आहे. तसेच वाचन हा माहिती देण्याचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. वाचन संस्कृतीकडे तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात लोकसहभागातून तसेच नियोजन समितीच्या निधीतून गाव तेथे वाचनालय ही संकल्पना राबविण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, जि.प.शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नगर भवन येथे आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्षा कांचन चौधरी, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, ग्रंथालय विभागाचे सहायक संचालक जगदीश पाटील, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आर.आर.राऊत, कार्यवाहक विनोद देशपांडे उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना हा सर्वात मोठा ग्रंथ आहे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, जगात आपल्या राज्यघटनेचे कौतुक होते. त्यासाठी डॉ. आंबेडकरांनी भरपूर वाचन केले. सातारा जिल्ह्यात ज्याप्रमाणे पुस्तकाचे गाव आहे. त्याच धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक गावस्तरावर वाचनालय उभारण्यात येईल. यातून नवीन पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन ते स्पर्धेच्या युगात टिकाव धरू शकतील. अभ्यासिका हा माझा सुरवातीपासून आवडीचा विषय राहिला आहे. यवतमाळ येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांकरीता 6 कोटी रुपये खर्च करून वातानुकुलीत अभ्यासिका बांधण्यात येत आहे. त्यासाठी राज्याच्या वित्तमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे.
शब्दापूर्वी व्यक्ती चित्र रेखाटत होता. प्रतिमा, प्रतिभा आणि संकल्पना यांच्या संगमातून पुस्तक जन्माला आले. वाचनामुळे माणसाचे व्यक्तिमत्व फुलते. ग्रंथाची निर्मिती ही अक्षरापासून होत असते. ज्याचा नाश होत नाही, ते म्हणजे अक्षर. आजकाल प्रवासात पुस्तके वाचण्याची सवय काही लोकांमध्ये दिसून येते. मोबाईल, टॅब, लॅपटॉपमध्ये ग्रंथ किंवा पुस्तके डाऊनलोड करणा-यांची संख्या जास्त आहे. माहिती व जनसंपर्क विभागातर्फे प्रकाशित होणारे लोकराज्य आता चार भाषांत उपलब्ध आहे. देशात सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून त्याचा नावलौकिक झाला आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, शासनाचे महत्वाचे निर्णय लोकांना कळतात. महाराष्ट्र वार्षिक हे स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त प्रकाशन राज्य शासनाने केले आहे. त्याला मिळणार प्रतिसाद बघता जास्तीच्या अंकांची छपाई करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर असलेले महामानव हे पुस्तकसुध्दा अतिशय उपयुक्त असून बाबासाहेबांच्या प्रत्येक धोरणांची माहिती त्यात आहे. पुस्तकाने माणसाला कधीच दगा दिला नाही. वाचनाचा प्रचार आणि प्रसिध्दी नियमित होणे गरजेचे आहे. ग्रंथालय, संयोजन समितीच्या ज्या काही समस्या असतील, त्या नक्कीच सोडविण्यात येतील, असे पालकमंत्री म्हणाले.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सातारा जिल्ह्यातील पुस्तकाचे गाव याचा संदर्भ देत माणसाच्या प्रगतीसाठी वाचन आणि ज्ञान आवश्यक असल्याचे सांगितले. युवकांनी सोशल मिडीयावरचा वेळ थोडा कमी करून वाचनाकडे लक्ष द्यावे. ग्रंथांमुळे अनेकांचे आयुष्य बदलले. या दोन दिवसात यवतमाळ येथील नागरिकांना साहित्याची जत्रा अनुभवता येणार आहे. नागरिकांसाठी ही एक चांगली पर्वणी असून या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.
यावेळी नगराध्यक्षा कांचन चौधरी म्हणाल्या, संविधानाची प्रत ही प्रत्येक घरी असलीच पाहिजे. आज सत्कार करतांना आयोजन समितीने ही प्रत उपलब्ध करून दिली, हे कौतुकास्पद आहे. वाचाल तर वाचाल, ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे. येथे उपलब्ध असलेल्या ग्रंथांची नागरिकांनी खरेदी करावी. तसेच ते घरात केवळ शोभेची वस्तु म्हणून ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
तत्पूर्वी पालकमंत्री येरावार यांच्या हस्ते फित कापून दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे रितसर उद्घाटन करण्यात आले. सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात अभ्यंकर कन्या विद्यालय, जि.प.कन्या शाळा, न.प. शाळा, मॉन्टेसरी विद्यालय, स्कूल ऑफ स्कॉलर्स, नंदूरकर विद्यालय, सावित्रीबाई फुले समाजकार्य महाविद्यालय, ग्रंथालय तसेच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश होता.  
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने यांनी केले. संचालन सुरेश गांजरे यांनी तर आभार गजानन कासावार यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                           0000000 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी