सव्वा एकरात 200 क्विंटल हळदीचे उत्पादन

केमच्या मार्गदर्शनात लिझा तत्वाने केली लागवड
यवतमाळ, दि. 23 : पारंपारिक शेतीला फाटा देत प्रायोगिक तत्वावर हळद लागवडीच्या प्रयोगातून ज्ञानेश्वर सुरोशे यांनी भरघोस उत्पादन घेतले आहे. कृषीसमृध्दी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या (केम) मार्गदर्शनात सव्वा एकरात त्यांनी लिझा तत्वाने हळदीची लागवड केली. हंगामाअखेर तब्बल 200 क्विंटल हळदीचे उत्पादन निघाले. यातून त्यांच्या हाती सव्वाचार लाख रुपये निव्वळ नफ्याच्या स्वरुपात आले. त्यामुळे यावर्षी 4 एकरात त्यांनी हळद लावली आहे.
महागाव तालुक्यातील अंबोडा येथील रहिवासी असलेले सुरोशे यांचा मुळ पिंड शेती आहे. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. रासायनिक खताच्या अति वापराने शेतीचे तंत्र बिघडले असून ते सुधारण्याची गरज आहे, अशी त्यांची धरणा आहे. त्यामुळे केवळ गोमुत्र, शेणखत व एस – 9 कल्चरच्या भरोश्यावर त्यांनी पाच पैकी सव्वा एकरात हळद लागवड केली. प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या अभिनव प्रयोगातून त्यांना एकूण 200 क्विंटल उत्पादन आले. हळदीच्या बेण्याची विक्री अडीचशे रुपये प्रति क्विंटल या दराने त्यांना एकूण 5 लक्ष रुपये मिळाले. यातील लागवड व इतर खर्च 72 हजार 150 रुपये वजा करता निव्वळ नफा 4 लक्ष 27 हजार 850 रुपये हाती आले.
अंबोडा येथे कृषी समृध्दी  समन्वयीत कृषी विकास प्रकल्प (केम) राबविला जात आहे. प्रकल्पाअंतर्गत गाव विकास समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून ते या प्रकल्पासोबत जुळले. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे समन्वयक कुंदन चव्हाण यांनी लिझा (लघुत्तम बाह्यनिविष्ठाद्वारे शाश्वत शेती) चे तत्व शेतकऱ्यांना समजवून सांगितले. या प्रकल्पाची संकल्पना, तत्व व पध्दत सुरोशे यांना आवडली. कारण ते मुळातच रासायनिक खताच्या जास्त वापराच्या विरोधात होते. संतुलित खताचा वापर व शेण खताच्या वापराने शेतीच्या पोत सुधारतो. शेतीला गोमुत्र व शेणखत असेल तर उत्पादनात शाश्वती असते. तसेच त्याला लागणारा खर्च ही कमी असतो व नैसर्गिक आपत्ती आल्यास फारशी झळ पोहोचत नाही, असे त्यांचे प्रामाणिक मत आहे.  त्यांच्याकडे 4 गायी व काही शेळ्या असून त्याचा उपयोग दूधासोबत शेणखत व गोमुत्रासाठी करतात. लिझाची पध्दत त्यांना आवडल्यामुळे त्यांनी या प्रकल्पांतर्गत समविचारी शेतकऱ्यांना घेवून जय बजरंग पुरुष शेतकरी गटाची स्थापना केली.
आपल्या शेतात त्यांनी हळद पीक लिझा तत्वावर घेण्याचा विचार केला. ही संकल्पना नवीन असल्याने त्यांना त्याची फारशी माहिती नव्हती. केवळ प्रयोग म्हणून त्यांनी एकूण क्षेत्रफळापैकी केवळ सव्वा एकर शेती या पिकासाठी गुंतविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हळदीच्या बेण्याचा शोध सुरू झाला. गावाजवळील तामसा कोळगाव येथून गजानन जगदाळे यांच्याकडून 10 क्विंटल शेलम जातीचे बेणे त्यांनी आणले. बेणे कसे ठेवावे याची पुरेशी माहिती नसल्याने 2 क्विंटल बेणे खराब झाले. ओलीताची सोय असल्याने जुनच्या पहिल्या आठवड्यात बेण्याची लागवड सरीवर करून ठिंबक सिंचनाच्या माध्यमातून ओलीताची  सोय करण्यात आली. बेणे लागवडीच्या पूर्वी जमिनीत भरपूर शेणखत टाकून केवळ 1 पोतं रासायनिक खत दिले. त्यानंतर ड्रीप मधून गोमूत्र, एस – 9 ऊर्जा बायोडायनामिक पध्दतीने तयार करून व गाळून ड्रीप मार्फत सोडण्यात आले. गवतावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांनी 2 वेळा कोळपणी केली. हळद काढणीला आली तेव्हा त्यांनी विचारही केला नव्हता की केवळ प्रयोगचं रुपांतर विक्रमात होईल.
हळदीच्या उतारा सरासरी 60 ते 70 क्विं. प्रती एकर असतो. परंतु त्यांच्या हाती 200 क्विंटल उत्पादन आले. सुरोशे यांनी 190 क्विंटल हळद बेण्यासाठी इतर शेतकऱ्यांना विकली. त्यातून त्यांना 4 लाख 27 हजार रुपये मिळाले. हळद पिकाच्या उत्पादनातून नवीन ट्रॅक्टर घरात आला. केवळ एका प्रयोगाने त्यांची आर्थिक स्थिती बळकट झाल्याने त्यांनी यावेळी हळद लागवडीची क्षेत्र वाढविले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी