पर्यटन क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीची क्षमता - पालकमंत्री मदन येरावार

उमरसरा परिसरातील संकटमोचन तलाव येथे विविध विकासकामांचे भुमिपूजन

यवतमाळ, दि 4 : जगामध्ये श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर आदी देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारीत आहे. आपल्या देशामध्येसुध्दा उत्तरांचल, सिक्कीम, केरळ, हिमाचल प्रदेश ही राज्ये पर्यटनात आघाडीवर आहेत. पर्यटन हा आता अर्थव्यवस्थेचा घटक बनला असून या क्षेत्रात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
उमरसरा परिसरातील संकटमोचन तलाव येथे सौंदर्यीकरण, म्युझिकल फाऊंटेन, बोटींग आदी विकास कामांचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे बांधकाम व्यवस्थापक विनय बावधणे, अमरावती येथील प्रादेशिक व्यवस्थापक प्रशांत सवई, विशेष कार्य अधिकारी एस.डी.धामणे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, न.प.बांधकाम सभापती अमोल देशमुख, आरोग्य सभापती नितीन गिरी, महिला व बालकल्याण सभापती सुषमा राऊत, शिक्षण सभापती कीर्ति राऊत, नियोजन सभापती सुजित राय, उपसभापती रिता धावतोळे, नगरसेवक दिनेश चिंडाले उपस्थित होते.
महाराष्ट्राला 720 किमीचा समुद्र किनारा लाभला आहे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, आपल्या राज्यात अजिंठा-वेरूळचा सांस्कृतिक वारसा, थंड हवेची ठिकाणे, व्याघ्र प्रकल्प, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या भागात असलेले जंगल आदी बाबी पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. रोजगार निर्मिती व नागरिकांना करमणूक म्हणून पर्यटन क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. यवतमाळ येथील टिपेश्वर अभयारण्य तसेच सहस्त्रकुंड धबधबा देशाच्या नकाशावर आला आहे. या दोन्ही क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपये दिले आहे. बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा धरणाच्या पायथ्याशी पर्यटन विकासाकरीता 7 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून येथे एक रिसोर्ट तयार करण्यात येईल. पर्यटनातून विकासाची दिशा कळते. बेरोजगारांच्या हाताला काम देण्याची ताकद या क्षेत्रात आहे. नागपूर विमान तळावर उतरले की विदर्भातील पर्यटन स्थळांचा परिचय करून देणारे चित्र लावले आहे.
थाटेश्वर ते कोटेश्वर असा प्रकल्प विकसीत करण्यात येणार आहे. महाबळेश्वरसारखे पुजा स्थळ येथे निर्माण होणार असून केबल ब्रिज बनविण्याचे नियोजन आहे. तसेच अष्टविनायक सर्किट, ज्योतिर्लिंग विकास, टूरिझम कॉरिडोर राज्य शासनातर्फे करण्यात येत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने यवतमाळ जिल्हा अत्यंत सुंदर, सर्व सोयीसुविधायुक्त बनविणे तसेच विकासाचे कोणतेही मॉडेल यवतमाळात आणण्यासाठी आपले नेहमीच प्राधान्य राहिले आहे. त्यासाठी 14 व्या वित्त आयोगातून शहराच्या विकासासाठी उत्कृष्ट मॉडेल तयार केले आहे. नगर परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी शहराच्या मध्यभागी टी.बी.रुग्णालयाचा प्रस्ताव करण्यात आला आहे. येथे तयार करण्यात येणा-या गाळ्यांमधून न.प.ला उत्पन्न मिळणार आहे.
जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. दोन-दोन राष्ट्रीय महामार्ग, समृध्दी मार्ग आदी रस्त्यांची कामे सुरू आहेत. अंतर्गत रस्त्यांसाठी 40 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. अडीच कोटी हायमॅक्स लाईटसाठी, 6 कोटी आठवडी बाजारासाठी, 19 कोटी भुमिगत वाहिन्यांसाठी, साडेपाच कोटी सिंथेटिक टॅकसाठी, साडेसहा कोटी स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासिकेसाठी देण्यात आले आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, असे गरीब विद्यार्थी या अभ्यासिकेत स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतील. पाणी पुरवठासाठी 309 कोटी रुपयांची अमृत योजना सुरू आहे. यापूर्वी जिल्ह्याच्या विकासाकरीता एवढा निधी कधी मिळाला नव्हता. पर्यटनाचा निधीतर कधी बघितला नाही. मात्र आता केंद्रात आणि राज्यात विकासाचे सरकार आले आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
राज्य शासनाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत उमरसरा येथील संकटमोचन तलाव परिसराच्या विकासासाठी 4 कोटी 99 लक्ष 36 हजार रुपयांच्या निधीस मान्यता दिली असून 50 लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या अंतर्गत संकटमोचन तलाव परिसरात उपहारगृह, स्वच्छतागृह, संरक्षक भिंत, म्युझिकल फाऊंटेन, बोट, बागबगीचा, विद्युतीकरण आदी सुविधा उभारण्यात येणार आहे. हे कामाचे कंत्राट अमरावती येथील एस.डी.गाडगे यांना देण्यात आले असून सदर काम 9 महिन्यांच्या आत एप्रिल 2018 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते विधिवत पुजा करून तसेच कुदळ मारून विविध विकास कामांचे भुमिपूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक विजय खडसे, मनोज मुधोळकर, रेखा कोठेकर, माया शेरे,  संगिता कासार, कंत्राटदार निशिकांत भिवगडे, सुधीर गाडगे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी