सरकारच्या योजना शेवटच्या उपेक्षित माणसांपर्यंत पोहचवा - पालकमंत्री येरावार

Ø गहूली हेटी येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला धनादेश वाटप

यवतमाळ, दि. 28 : सामान्य नागरिकांचा सर्वांगीन विकास करणे हे सरकारचे ध्येय आहे. समाजाच्या उपेक्षित घटकांतील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजना शासकीय यंत्रणेने तसेच लोकप्रतिनिधींनी त्यांच्यापर्यंत पोहचवाव्यात. याकडे सरपंचांनी गांभिर्याने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
            यवतमाळ तालुक्यातील गहूली हेटी येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला धनादेश वाटप तसेच लाभार्थ्यांना धडक सिंचन विहिर प्रमाणपत्र वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार सचिन शेजाळ, गहूली हेटीचे सरपंच संदेश राठोड, बोदबोडणचे सरपंच दिनेश पवार, बाळासाहेब शिंदे, अमर दिनकर उपस्थित होते.
            गावाच्या विकासाकडे सरपंचांनी लक्ष द्यावे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, घरातील गेलेला जीव परत आणता येणार नाही. मात्र अशा कुटुंबाला धीर देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सरकारकडून हा मदतीचा हात असून विधवा पत्नी ज्योती पवार ह्या अपंग असल्यामुळे त्यांना अपंगांचा पगार सुरू करण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव तहसीलदारांकडे त्वरीत पाठवावा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या. शेतक-यांना धडक, मनरेगाच्या विहिरींचा लाभ देण्याचे सरकारचे धोरण आहे. शेतीचा खर्च कमी करून जास्त उत्पादन येण्यासाठी सरकारने मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार, धडक सिंचन, कृषी पंप वीज जोडणी, आदी योजना आणल्या आहेत. या योजनांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा. जिल्ह्यात 100 शेततळ्यांची कामे सुरू झाली आहेत. विहिर झाल्यानंतर  डिमांड नोट भरली तर लगेच वीज जोडणी देण्यात येईल.
सरकार समाजातील शेवटच्या घटकासाठी काम करीत आहे. यावर्षी देशात सर्वात जास्त तूर महाराष्ट्राने खरेदी केली. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला तर लोकांचा शहराकडे जाण्याचा ओढा कमी होईल. त्यामुळे शहरातील सुविधा गावातच देण्याचा मानस आहे. रस्ता, पिण्याचे पाणी, डिजीटल शाळा आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. 0 ते 18 वयोगटातील मुलांना दुर्धर आजार असेल तर त्यावर मुंबईत शासनाच्यावतीने उपचार करण्यात येत आहे. राष्ट्रीय बाल सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील नुकतेच 41 मुलांवर उपचार करण्यात आले. त्यांच्या पालकांची राहण्याची तसेच खाण्याची सोय मोफत करण्यात आली. असे आजार असतील तर त्यासाठी नागरिकांनी त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते जयहिंद पवार यांच्या विधवा पत्नी ज्योती पवार यांना 1 लक्ष रुपयांचा धनादेश तसेच धडक सिंचन विहिरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी किन्ही येथील संजय तलमले, सुनील मरगडे, अजगर अली वाहेद अली, चंद्रकला केराम, बाबुसिंग खोमला जाधव, इचोरी येथील नरेश चमेडिया, पुष्पा शिंदे, नानीबाई कातोरे यांना धडक सिंचन विहिरींचे प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाला पटवारी आर.आर.जाधव, कृषी सहाय्यक यू.व्ही. मोहुर्ले यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
                                                000000

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी