पालकमंत्र्यांनी केली बोंडअळीग्रस्त पिकाची पाहणी

Ø शेतक-यांनी तक्रारी करण्याचे आवाहन


यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी कृषी शास्त्रज्ञ तसेच कृषी विभागाच्या अधिका-यांसह कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा येथील राजेंद्र पांडे यांच्या शेतातील बोंडअळीग्रस्त पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके, गावचे सरपंच एच.एच. ठाकरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश नेमाडे, कृषी विद्यापीठाचे डॉ. राठोड, डॉ. कोल्हे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विस्तार अधिकारी कैलास वानखेडे आदी उपस्थित होते.
 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतक-यांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाई करीता शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांनी याबाबत तक्रारी द्याव्यात. नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण कृषी सहाय्यक स्तरावर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शासनाचे आदेश येताच त्वरीत सर्व्हे करू. बी.टी – 3 या बियाण्याला परवानगी नाही. तरीसुध्दा ते विकले गेले व शेतक-यांनी खरेदी केले. ज्या शेतक-यांचे नुकसान झाले त्यांना त्वरीत मदत मिळवून देण्याला आपले प्राधान्य आहे. निश्चित नुकसान किती झाले, याचा लवकरात लवकर आढावा घेतला जाईल. शेतक-यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव का झाला, याची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाच्या संपूर्ण टीमसह शेतात आलो आहे. शेतक-यांना नक्कीच मदत केली जाईल, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.
यावेळी मुसळ, कुसळ, खोरद, रोडा, आंतरगाव, पालोती, पिंपळशेंडा आदी नुकसानग्रस्त भागातील शेतकरी उपस्थित होते.
                                                      0000000 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी