महिला बचत गटाने शोधली प्रगतीची वाट

Ø जुट प्रक्रियेतून 2 लाखांची विक्री
यवतमाळ, दि. 29 : बचत गटाच्या चळवळीमुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. उपजिवीकेचे साधन निर्माण करण्यासाठी महिलांना ही चळवळ उपयोगी ठरत आहे. महागाव तालुक्यातील पिंपरी (इजारा) येथील संस्कृती महिला बचत गटानेसुध्दा कृषी समृध्दी विकास प्रकल्पाच्या मार्गदर्शनात प्रगतीची वाट शोधली आहे. जुट बारदाण उद्योगातून या महिला बचत गटाने यावर्षी 2 लक्ष 10 हजार रुपयांची विक्री केली आहे.
संस्कृती महिला बचत गटाची स्थापना पिंपरी येथे 2015 मध्ये करण्यात आली. या गटात एकूण 11 महिला कार्यरत आहेत. यातील 10 महिला आदिवासी असून त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. आपले घरगुती तसेच शेतातील काम आटपून या महिला बचत गटाचे काम करीत आहेत. दोन वर्षापूर्वी पुणे येथे ॲग्रो व्हिजनचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला पिंपरी येथील महिलांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी ज्युटवर प्रक्रीया करणारे मशिन बघितले. काहीतरी वेगळे करण्याच्या संकल्पनेतून त्यांनी हा व्यवसाय निवडला. ज्युट प्रक्रीया हा प्रकल्प महिलांसाठी नवीनच होता. बचत गटामध्ये एकमेव पदवीधर असलेल्या गायत्री रानडे यांनी या व्यवसायासंदर्भातील माहिती एकत्रित करणे सुरू केले. ज्युटवर प्रक्रीया करणारे मशिन इंदोर येथून मिळेल, असे त्यांना कळले.
कोणत्याही व्यवसायासाठी प्रशिक्षण महत्वाचे असते. संस्कृती महिला बचत गटातील 3 महिला सदस्यांनी पुढाकार घेऊन व्यवसायास सुरुवात केली. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टने प्रशिक्षण आयोजित केले. त्यात मशिन व्यवस्थापन आणि मालाची गुणपत्ता, कागदपत्रे व्यवस्थापन आणि आर्थिक नियेाजन, वाया जाणाऱ्या कच्या मालाचे व्यवस्थापन या विषयांचा समावेश होता. व्यवसायासाठी कर्ज आणि इतर ठिकाणावरून पैशाची जुळवाजुळव झाल्यानंतर त्यांनी इंदोर येथून रामचंद्र शर्मा यांच्याकडे रेव्हो कंपनीच्या मशीनची मागणी केली. सोबतच एच.एम.शाह या कंपनीकडे कच्या मालाची ऑर्डर देण्यात आली.
महिलांनी आपल्या व्यवसायाची माहिती देण्यासाठी परिसरातील अनेक व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी विभाग, साखर कारखाने आदींना भेटी दिल्या. या व्यवसायाची माहिती सर्वत्र पसरल्याने शेतकऱ्यांकडून बारदाण्याची मागणी येवू लागली. एकूण 1600 बारदाणे (रू.30/- प्रती) बारदाणा प्रमाणे संस्कृती महिला बचत गटाने शेतकऱ्यांना थेट विक्री केली. राहूरी येथील व्यापाऱ्याला 5000 तर अंबोडा (आर्णी) दालमिलला 5000 बॅग पुरविण्यात आल्या. तसेच महागाव तालुक्यातील गटविकास अधिकारी यांनी 3000 बॅग विक्री करीता मदत केली आहे. आतापर्यंत गटाने 2 लक्ष 10 हजार रूपयांची विक्री केली आहे. झालेल्या विक्रीतून बँकेच्या कर्जाचा हप्ताही सुरळीत सुरू आहे.
आज या महिला ज्युट (तागा) पासून बारदाने, पायपुसनी, पिशव्या, मोबाईलचे कव्हर बनवित आहे. शिवाय जुन्या बारदाण्यांवर प्रक्रिया करून शेतक-यांना त्या स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचे काम महिला बचत गटाकडून होत आहे.
                                                            000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी