जिल्ह्यात 39 “मिलेनियम व्होटर”

राष्ट्रीय मतदार दिवशी होणार सत्कार
यवतमाळ, दि. 29 : जन्मतारखेचे प्रत्येकाच्या आयुष्यात विशेष महत्व असते. काही विशिष्ट तारखांना जन्म झाला असेल तर तो दिवस निरंतर लोकांच्या लक्षात राहतो. नवीन वर्षाची पहिली तारीख आणि त्यातही नवीन शतकाची सुरवात म्हटले की मग काही विचारायलाच नको. अशीच तारीख आहे 1 जानेवारी 2000. ही तारीख 18 वर्षांपूर्वी येऊन गेली. मात्र 1 जानेवारी 2018 ला वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे यावेळेस मिलेनियम व्होटर ठरणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत असे 39 मिलेनियम व्होटर आढळले आहेत. या लकी मिलेनियम मतदारांचा राष्ट्रीय मतदार दिवशी (25 जानेवारी) सत्कार होणार आहे.
मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते. वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या तरुण-तरुणींना राज्यघटनेनुसार मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. नव मतदारांची नोंदणी करण्यासाठी केंद्रीय निवडणुक आयोगाने मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्यांचा जन्म 1 जानेवारी 2000 रोजी झालेला असेल त्या मुला-मुलींची मिलेनीयम मतदान म्हणून नोंदणी करून घ्यायची आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने अशा मतदारांचा शोध घेण्याचे कार्य सुरू केले आहे. जन्माची नोंद ही संबंधित नगर परिषद आणि ग्रामपंचायतीत तसेच विद्यार्थ्यांच्या शाळा - महाविद्यालयांमध्ये प्रवेशावेळी करण्यात येते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित संस्थांमधून जन्मतारखेच्या नोंदी मागवून घेतल्या. यात आतापर्यंत 39 मिलेनियम व्होटर आढळून आले आहे.
यापैकी कळंब येथील इंदिरा महाविद्यालयात बी.ए.(प्रथम) मध्ये शिकणा-या अनिकेत गिरीधर अढाळ (रा.गार्डन चौक, कळंब) आणि राळेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात इयत्ता 12 वी ला शिकणारी रुचिता संजय ताटेवार (रा.शांतीनगर, राळेगाव) या दोघांनीही आपल्या जन्मतारखेच्या पुराव्यासह आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे नव मतदार नोंदणी अर्ज सादर केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संदीप महाजन उपस्थित होते.
                                                         000000  

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी