आदिवासी बांधवांनो शासकीय योजनांचा लाभ घ्या - पालकमंत्री येरावार

Ø शिबला येथे सरकार आपल्या दारी अंतर्गत समाधान शिबिर


यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यात आदिवासी बांधवांची संख्या भरपूर आहे. पांढरकवडा, पुसद, झरी जामणी हे आदिवासी बहुल तालुके आहेत. आदिवासींसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा आदिवासी बांधवांनी लाभ घेऊन स्वत:चे जीवनमान उंचवावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
झरी जामणी तालुक्यातील शिबला येथे सरकार आपल्या दारी उपक्रमांतार्गत आयोजित समाधान, मोफत रोगनिदान तसेच उपचार व रक्तदान शिबिरात ते प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, झरीच्या पंचायत समिती सभापती लता आत्राम, शिबलाचे सरपंच पारिकराव टेकाम, जि.प.सदस्य मिनाक्षी बोलेनवार, संगिता मानकर, बंडू चांदेकर, पं.स.सदस्य राजेश गोंडावार, भाऊराव मेश्राम, नितेश जुनघरे, अतिरिक्त्‍ जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, डॉ. महेंद्र लोढा आदी उपस्थित होते.
आदिवासी नागरिकांसाठी असलेल्या सर्व योजनांची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि संबंधित शासकीय यंत्रणेने त्वरीत करून द्यावी, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, स्वयंमच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी तालुकास्तरावर योजनांची माहिती देऊन त्यांच्याकडून अर्ज मागविणे. अंगणवाडीतील बालकांना आहारा अंड्यांचा पुरवठा करण्यासाठी मदर युनीट सुरू करणे. आदिवासी समाजातील 10 विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, दरवर्षी 25 हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश, जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी शिथिल करण्यात आलेल्या अटी आदी योजना तुमच्यासाठी आहेत. या योजनांचा लाभ घ्या.
समाधान शिबिराच्या माध्यमातून सरकार तुमच्या दारी आले आहे. अधिका-यांसमोर तात्काळ तक्रारींचे निवारण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एकाच दिवशी सर्व प्रश्न सुटणार नाही. मात्र ते सोडविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे तुमचे आहे. सरकार शेतकरी, शेतमजूर यांच्यासह समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी काम करीत आहे. नागरिकांना मुख्यालयी येण्यापेक्षा आपल्या दारातच सर्व योजनांची माहिती या माध्यमातून होते. ऑप्टीक फायबर केबलने संपूर्ण जिल्हा जोडल्यानंतर ग्रामपंचायतींमध्ये सर्व कागदपत्रे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मोबाईल टावर या भागात उभारल्या जाईल. कौशल्‍य विकासाच्या माध्यमातून कुटुंबातील चारही सदस्य क्रियाशील बनविणे, त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे, हे शासनाचे ध्येय आहे. 2018 पर्यंत जिल्ह्यातील सर्व पं.स. जि.प.शाळा डिजीटल करण्याचा मानस आहे. यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच सिंचनाचे पाणी टेलपर्यंत जात आहे. राष्ट्रीय बाल कल्याण कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वयोगटातील 61 विद्यार्थ्यांवर शासनाच्या खर्चातून मुंबईत उपचार करण्यात आले. नारायणा, टाटा ट्रस्ट, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी यांच्या समन्वयातून मुंबईत 100 टक्के उपचार करण्यात येत आहे, असे पालकमंत्री येरावार यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांच्या तक्रारी स्वीकारून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच तक्रारीवर त्वरीत कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले.
तत्पूर्वी रार्ष्टीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत 20 लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी समाजसेवक धर्माजी आत्राम, डॉ. महेंद्र लोढा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित वैद्यकीय तपासणी शिबिरात 1200 नागरिकांची तपासणी करण्यात आली.  
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार गणेश राऊत यांनी केले. संचालन गोरक्षनाथ आबुज यांनी तर  आभार गटविकास अधिकारी शिवाजी गवई यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण, शल्य चिकित्सक डॉ. धोटे, अधिक्षक अभियंता बी.एन. माहुरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी