तीन एकर पडीत ते बारा एकर ओलित

Ø नरेगातील सिंचन विहिरीमुळे शेतकरी सुखावला
यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस…..पाण्याची पातळी खालावलेली….बोंडअळीचा प्रादुर्भाव…..किटकनाशक फवारणी ……अशा एक ना अनेक समस्यांचा जिल्ह्यातील शेतक-यांना सामना करावा लागला. ही परिस्थिती जवळपास सगळीकडे सारखीच. मात्र शेतक-याला नरेगातून सिंचन विहिरीचा आधार मिळाला आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे बारा एकर शेती फुलली. स्वत:च्या मालकीची तीन एकर पडीत ते आता बारा एकर ओलिताची शेती असा प्रवास केवळ नरेगाच्या सिंचन विहिरीमुळे झाला, याबद्दल शेतक-यांने कृतज्ञता व्यक्त केली.
हा अनुभव आहे यवतमाळ तालुक्यातील कापरा येथील अब्दूल कलीम शेख मेहबुब यांचा. मेहबुब भाई हे सावर येथील रहिवासी असून त्यांची कापरा ग्रामपंचायत हद्दित तीन एकर शेती आहे. ही शेती पडीत जमिनीवर असल्यामुळे सर्व काही वरच्या पावसावरच अवलंबून होते. दरवर्षी हीच परिस्थिती. त्यामुळे मेहबुब भाई यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अहिल्यादेवी वैयक्तिक सिंचन विहिरीसाठी अर्ज केला. त्यानुसार त्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात आला. तीन लक्ष रुपये खर्च करून शासनाच्या अनुदानातून केवळ चार महिन्यात त्यांची विहीर बांधून पूर्ण झाली.
यावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावली आहे. मात्र असे असतांना मेहबुब भाईच्या विहिरीला चक्क 10 ते 12 फुट पाणी आहे. पाण्याच्या या उपलब्धतेमुळे त्यांनी आपल्या तीन एकर सोबतच आजुबाजुची 9 एकर शेती करायला घेतली आहे. सुरवातीला स्वत:च्या मालकीची तीन एकर शेती करणेसुध्दा त्यांना अवघड होते. सध्या मेहबुब भाई बारा एकरवर ओलिताची शेती करीत आहे. सोयाबीन, तूर, भेंडी, चवळी, हरभरा त्यांनी लावला आहे. आता शेतात गहू लावणार आहे. चवळी आणि भेंडीच्या उत्पादनातून त्यांनी 80 हजार रुपयांचा नफा कमाविला आहे. स्वत:च्या तीन एकरमधून दीड लक्ष रुपये आणि भाड्याने करीत असलेल्या शेतीतूनसुध्दा दीड लक्ष असे तीन लक्ष रुपयांचे उत्पादन यावर्षी हाती येईल, असे ते विश्वासाने सांगतात. या विहिरीमुळे आमच्या जीवनात कायापालट झाला, असे मेहबुब भाई म्हणाले.
यावेळी कापराचे सरपंच घनश्याम गायकी म्हणाले, 2100 लोकसंख्या असलेल्या या गावात 350 कुटुंब आहेत. यापैकी 60 कुटुंबाला नरेगा अंतर्गत सिंचन विहिरींचा लाभ देण्यात आला आहे. तसेच आदिवासी उपयोजना आणि विशेष घटक योजनेतूनसुध्दा प्रत्येकी 10 लाभार्थ्यांना सिंचन विहिरी देण्यात आल्या आहेत. यावेळी ग्रामसेवक अमोर घावडेसुध्दा उपस्थित होते.
                                                     0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी