विभागीय आयुक्तांनी घेतला विविध विषयांचा आढावा

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक 
यवतमाळ, दि. 23 : अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते.
यावेळी पियुषसिंह म्हणाले, मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत ॲक्शन प्लॅन तयार झाला आहे. त्यामुळे काम त्वरीत सुरू करा. शेततळ्यांची संपूर्ण कामे मार्च 2018 अखेरपर्यंत करण्याचे शासनाचे आदेश असल्यामुळे संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे. जलयुक्त शिवार योजनेसंदर्भात प्रत्येक यंत्रणेला दिलेली कामे त्वरीत सुरू करावी. धडक सिंचन योजनेचा लाभ देण्यात येणा-या लाभार्थ्यांना अग्रीम रक्कम अदा झाली असल्यास त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश द्यावे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सातत्य ठेवा. गुड मॉर्निंग आणि मॉनेटरींग पथकाचा आढावा नियमित घ्या. बोंडअळीच्या प्रादुर्भावासंदर्भात ज्या शेतक-यांच्या तक्रारी आल्या असतील, त्यांचे सर्व्हेक्षण त्वरीत करा. बेंबळा प्रकल्पांतर्गत पूनर्वसनासाठी निधी मंजूर झाला आहे. मार्च 2018 पर्यंत 18 नागरी सुविधांसह सर्व कामे पूर्ण करा. या अंतर्गत एकूण कामे किती, किती कामांचे प्रस्ताव तयार आहे. तसेच गावनिहाय प्रस्ताव या आठवड्यात जिल्हाधिका-यांकडे सादर करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन विहीर, कृषीपंप वीज जोडणी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, कायदा व सुव्यवस्था, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प आढावा, निम्न पैनगंगा, राजीव गांधी जीवनदायी योजना, महामार्गांची स्थिती, बळीराजा चेतना अभियान, शेतक-यांच्या आत्महत्यासंदर्भातील स्थिती, बोंडअळी प्रादुर्भाव, पाणी टंचाई आदी विषयांचा आढावा घेतला. तसेच गतवर्षी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात जिल्ह्याबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीतील विषयांवर काय कार्यवाही झाली, याबाबत सुध्दा माहिती घेतली.
बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जयंत देशपांडे, संदीपकुमार अपार, नगर पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धोटे, तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                                            00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी