पत्रकारितेमध्ये स्पर्धा आणि व्यावसायिकता ही आव्हाने – न.मा.जोशी

Ø जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन



पत्रकारितेमध्ये स्पर्धा आणि व्यावसायिकता ही आव्हाने – न.मा.जोशी
Ø जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन
यवतमाळ दि. 16 : आज प्रत्येकच क्षेत्रात आव्हान आहे. पत्रकारितासुध्दा याला अपवाद नाही. पत्रकारितेतील व्यावसायिकता, स्पर्धा, भांडवलदारी प्रवृत्ती आणि विश्वासअहर्ता हे पत्रकारितेतील आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. त्याशिवाय उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेतील विचार, अभिव्यक्ती आणि मतस्वातंत्र्य कायम राहणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार न.मा.जोशी यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयात राष्ट्रीय प्रेस दिनानिमित्त आयोजित माध्यमांसमोरील आव्हाने या विषयाबाबत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मेहमूद नाथानी, दिनेश गंधे उपस्थित होते.
तंत्रज्ञानाच्या काळात सोशल मिडीयाच्या अनिर्बंध वापरामुळे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांपुढेसुध्दा एक नवीनच आव्हान उभे राहिले आहे, असे सांगून जोशी म्हणाले प्रिंट मिडीयातील पत्रकारितेबद्दल आजही सामान्य नागरिकांमध्ये विश्वासाची भावना आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत पत्रकारितेचे अनन्यसाधारण महत्व राहिले आहे. वृत्तपत्र स्वातंत्र कायम अबाधित असले पाहिजे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीची चिंता आज जगाला भेडसावत आहे. या क्षेत्रात उदारमतवादी मते, बोलण्याचे स्वातंत्र्य, व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य हे कायम असले पाहिजे. रशियात 1990 मध्ये मिखाईल गोर्व्हाचोव्ह यांनी ग्लॉसनास्त आणि पेरेस्त्राईका (खुलेपणा आणि मुक्त विचार) हा विचार मांडला. त्यानंतर पुढील वर्षी 1991 मध्ये रशियाचे छोट्या-छोट्या तुकड्यात विभाजन झाले. वृत्तपत्र उद्योगात आज आर्थिक बाबीला महत्व आले आहे. प्रेस आयोगाच्या शिफारसीवरून प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झाली. प्रेस कौन्सिलने वृत्तपत्रांच्या संदर्भात स्वातंत्र्य आणि मर्यादा याची जाणीव करून देण्यासाठी 16 नोव्हेंबर 1997 पासून राष्ट्रीय प्रेस दिन साजरा करण्याचे सुरू केले, असे त्यांनी सांगितले.
यावेळी नाथानी म्हणाले, यवतमाळ येथील किटकनाशक फवारणीचा विषय पत्रकारांनी लावून धरला त्यामुळ त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. यासाठी यवतमाळ येथील पत्रकार अभिनंदनास पात्र आहेत. नवीन आव्हानांचा सामना आज माध्यमांत करायचा आहे. प्रिंट मिडीयाचे महत्व आजही अबाधित आहे. जोपर्यंत कोणतीही बातमी पेपरमध्ये वाचत नाही, तोपर्यंत नागरिकांना त्याचा विश्वास वाटत नाही. समाजाला जागृत करण्याचे काम वृत्तपत्र करीत आहे, असे त्यांनी सांगितले. तर दिनेश गंधे म्हणाले, लोक पत्रकारांबद्दल अफवा पसरवित असतात. हे एक व्रत आहे. पेपरमध्ये येणारी बातमी 99 टक्के लोकांना मान्य असते. लोकमान्य टिळक, आगरकर, बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारितेचा पाया रचला. जग बदलत आहे, त्यामुळ पत्रकारांनीसुध्दा बदलणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
                                                     0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी