हक्काचे पाणी कमाविण्याची जिल्ह्याला संधी – जिल्हाधिकारी डॉ. देशमुख


सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा
Ø यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक तालुक्यांचा समावेश

यवतमाळ, दि. 28 : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी नकारात्मक ओळख आपल्या जिल्ह्याची आहे. ही ओळख पुसण्यासाठी सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे करण्याचे नियोजन आहे. वैशिष्ट्य म्हणजे राज्यात या स्पर्धेत सर्वाधिक तालुके यवतमाळ जिल्ह्यातील  आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपले हक्काचे पाणी कमाविण्याची सुवर्ण संधी आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन व पाणी फाऊंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेसंदर्भात आयेाजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जयंत देशपांडे, संदीपकुमार अपार, स्वप्नील कापडनीस, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, सुभाष मानकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या संकटावर मात करण्याची संधी आपल्याला मिळाली, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, पावसाच्या पडणा-या प्रत्येक थेंबावर आपला हक्क आहे. हे हक्काचे पाणी आपण आपल्या गावातच थांबविले तर पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. जिल्ह्यात जल, जलसंधारण आणि त्यातून प्रगती हे ध्येय गाठायचे आहे. गतवर्षी या स्पर्धेत जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश होता. यावर्षीच्या स्पर्धेत राळेगाव, कळंब, उमरखेड, यवतमाळ, घाटंजी आणि दारव्हा या सहा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत राज्यात सर्वाधिक तालुके यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होणा-या सहा तालुक्यातील 108 गावांचा समावेश जलयुक्त शिवारमध्ये आहे. त्यामुळे ही 108 गावे 100 टक्के सहभागी करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. यवतमाळचा वॉटर कप यावर्षी निश्चितच वेगळा असेल, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.  
पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ म्हणाले, सत्यमेव जयते वॉटर कप संदर्भात यावर्षीची पहिली बैठक यवतमाळमध्ये होत आहे. या माध्यमातून चांगली माणसे जोडून चांगल्या समाजाची निर्मिती हेच ध्येय आहे. डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्याला एक चांगले नेतृत्व लाभले आहे. प्रशासन, समाज आणि पाणी फाऊंडेशनचे समन्वयक यांच्या प्रयत्नातून यवतमाळ जिल्हा या स्पर्धेत प्रथम येईल. जलसंधारण कामाचा कणा माणूस आहे. दोन हातांनी चांगले काम होऊ शकते. आपल्या जिल्ह्यात जलक्रांती करण्यासाठी लोकांना हा कार्यक्रम आपला वाटला पाहिजे. ही एक लोकचळवळ आहे. श्रमदानातून आपण पाणी कमाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.      
 या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 50 लक्ष रुपये, द्वितीय पारितोषिक 30 लक्ष रुपये आणि तृतीय पारितोषिक 20 लक्ष रुपये असे आहे. तसेच सन 2018 च्या स्पर्धेकरीता निवड करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये शोष खड्डे, जलसंधारण, पाणी बचत, विहीर पुनर्भरण, रचनात्मक गुणवत्ता आणि वॉटरबजेट ही कामे करण्यात येतील. बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मुख्यमंत्री ग्रामविकास दूत, पाणी फाऊंडेशनचे समन्वयक आदी उपस्थित होते.
                                                    0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी