आरोग्य व विकासासाठी स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी - पालकमंत्री येरावार

राळेगाव पं.स. येथे हागणदारीमुक्तीबाबत कार्यक्रम


यवतमाळ, दि. 20 : स्वातंत्र्यपूर्व काळापासून महात्मा गांधी, संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेचा मंत्र आपल्याला दिला आहे. स्वच्छता ही सेवा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. स्वच्छतेचा संबंध हा आरोग्याशी निगडीत आहे. समाजव्यवस्था निरोगी, निकोप असली तरच देश प्रगतीपथावर पोहचेल. केवळ शौच्छालय बांधून उद्दिष्ट पूर्ण होणार नाही तर स्वच्छतेबाबत जनजागृती करणे ही खरी फलश्रृती आहे. त्यामुळे आरोग्य व विकासासाठी स्वच्छता ही लोकचळवळ होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
राळेगाव पंचायत समिती येथे उत्सव हागणदारीमुक्तीचा याबाबत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, आमदार डॉ. अशोक उईके, राळेगाव पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे, उपसभापती नीलेश रोठे, जि. प. सदस्य चित्तरंजन कोल्हे, उषा भोयर, प्रिती काकडे, पंचायत समिती सदस्या शिला सलामे, स्नेहा येणोरकर, प्रशांत तायडे, ज्योती खैरकार, राळेगावचे नगराध्यक्ष बबन भोंगारे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, गटविकास अधिकारी विनोद खेडकर आदी उपस्थित होते.
हागणदारीमुक्तीचे उद्दिष्ट राळेगाव पंचायत समितीने पूर्ण केले आहे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, यशवंत पंचायत राज अभियानात राळेगाव दुस-या क्रमांकावर आहे. आयएसओ मानांकन प्राप्त करणारी राळेगाव ही पहिली पंचायत समिती आहे. प्रायोगिक तत्वावर या पंचायत समितीने केलेल्या गोष्टी जिल्ह्यातील इतर पंचायत समित्यांसाठी मार्गदर्शक आहे. या बाभुळगाव, राळेगाव आणि कळंब हे तिनही तालुके हागणदारीमुक्त होणारे हे पहिले विधानसभा क्षेत्र ठरले आहे. देशाच्या पंतप्रधानांनी लाल किल्यावरून स्वच्छ भारत मिशन आणि घरोघरी शौच्छालय हे विषय जनतेसमोर मांडले. नागरिकांनाही स्वच्छतेचे गांभिर्य पटले आहे. मार्च 2018 पर्यंत संपूर्ण राज्य ओडीएफ करण्याचे उद्दिष्ट आहे.
स्वच्छता हे एक मिशन समजून त्यासंदर्भात काम गतीने होत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला असून आणखी निधी देण्यात येईल. या योजनेमागचे गांभिर्य सर्वांनी जपणे आवश्यक आहे. राळेगाव मतदार संघाचे आमदार डॉ. अशोक उईके आणि त्यांच्या संपूर्ण टिमचे मनापासून अभिनंदन. या तालुक्याचा आदर्श इतरही तालुक्यांनी घेणे गरजेचे आहे. उत्कृष्ट काम करणा-या अधिकारी- कर्मचा-यांची सेवा जिल्ह्यातील इतरही भागात उपलब्ध करून दिली तर जिल्ह्याची प्रगती लवकर होण्यास मदत होईल. सामान्य नागरिकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. हे सरकार आपले आहे, अशी भावना लोकांमध्ये निर्माण होत आहे. कर्जमाफी, वीज जोडण्या, पिण्याच्या पाण्याच्या योजना, जलयुक्त शिवार, धडक सिंचन, स्कॅटर्स सोर्सेस व स्टोरेज आदी विकासकामांसाठी जनेतची साथ आवश्यक आहे, असे पालकमंत्री येरावार यांनी सांगितले.
यावेळी राळेगाव पंचायत समिती ओडीएफ करण्यात मोलाचे सहकार्य करणारे तालुक्यातील सुनिता तोमर, प्रशांत महाजन, छाया कुमरे, आशिष पारधी, छाया उपाते, पुष्पा मडावी आदी सरपंचांचा तसेच विजया मुन, दिनेश फुलमाळी, आरती वडुले, राखी रेवतकर, जया पाटील आदी ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला. सोबतच ओडीएफ येथील कृषी अधिकारी राजेंद्र दुधे, शरद ईखे, शाखा अभियंता अभय ढोले, कृषी विस्तार अधिकारी पंकज बरडे, राळेगाव येथील तहसीलदार हेमंत गांगुर्डे, सहा.लेखा अधिकारी सिमा कांबळे, कनिष्ठ लेखा अधिकारी हितेश रायचुरा, तालुका समन्वयक महेंद्र गुल्हाणे यांचासुध्दा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन वसुंधरा माकोडे यांनी  तर आभार राळेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील जि.प.सदस्य, पं.स. सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
                                                            00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी