जलयुक्त शिवारमुळे जिल्ह्यात 68 हजार हेक्टरवर सिंचनाची सोय

यवतमाळ, दि. 1 : सन 2019 पर्यंत टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार गत तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सन 2015-16 आणि 2016-17 मध्ये जलयुक्तची एकूण 30 हजार 447 कामे पूर्ण करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यात 68 हजार 353 हेक्टरवर सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे.     
सिंचनाची पुरेशी सोय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसावर अवलंबुन रहावे लागते. मान्सुनने दगा दिल्यास खरीपाचे एक पीक घेणेही शेतकऱ्यांना अडचणीचे जाते. मान्सुनवर अवलंबुन न राहता दोन ते तीन पीके शेतकऱ्यांना घेता यावी म्हणून शासनाने मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, सिंचन क्षेत्रात वाढ करणे, विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेले व निकामी झालेल्या जलस्त्रोतांच्या पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पाणी अडविणे आणि जिरविणे बाबत नागरिकांना प्रोत्साहित करून लोकसहभाग वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामे घेण्यात आली आहे. त्यापैकी सन 2015-16 मध्ये 413 गावांमध्ये 23 हजार 338 तर सन 2016-17 मध्ये 225 गावांमध्ये 7 हजार 109 कामे अशी दोन वर्षात एकूण 30 हजार 447 पुर्ण झाली आहेत. यातून एकूण 81 हजार 373 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाल्याने जिल्ह्यात 68 हजार 353 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.  
सिंचन क्षमतेनुसार 2 पाणी दिल्यानंतर 2015-16 मध्ये 25 हजार 990 हेक्टरवर, 2016-17 मध्ये 9 हजार 23 हेक्टर असे एकूण 35 हजार 13 हेक्टरवर सिंचन झाले होते. हेच प्रमाण 1 पाणी दिल्यानंतर 70 हजार 26 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले होते.  
जिल्ह्यात कृषी विभागासह जलसंपदा, वने, सामाजिक वनिकरण, जिल्हा परिषद सिंचन, लघुसिंचन, भुजल सर्वेक्षण, पाणी पुरवठा या विविध विभागाने अभियानातून कामे हाती घेतली आहे. यात कृषी विभागाची पूर्ण झालेल्या कामांची संख्या 14 हजार 284 आहे. वनविभागाची पूर्ण झालेल्या कामांची संख्या 13 हजार 477, भुजल सर्वेक्षण विभागाची पूर्ण झालेली कामे 2 हजार 160, जिल्हा परिषद लघु सिंचन विभाग 90 कामे तर जलसंधारण विभागाची 436 कामे पूर्ण झाली आहेत. तसेच सर्व विभागांची 212 कामे प्रगथीपथावर आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागावर भर देण्यात येत आहे. अशा सहभागातून 10 लक्ष 77 हजार घनमिटर गाळ काढण्यात आला आहे. जलयुक्त अभियानांतर्गत निवडलेल्या सर्व गावांमध्ये जलसिंचनाची कामे घेवून ही गावे पाणीटंचाई मुक्त करण्यासोबतच गावांमध्ये शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.
                                        000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी