नरेगाअंतर्गत मजूरांना 193 कोटी रुपये मजूरी

Ø तीन वर्षात 28 हजार कामे पूर्ण
यवतमाळ दि. 15 : महाराष्ट्राने सुरू केलेली रोजगार हमी योजना ही राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलपात्र ठरली आहे. मागेल त्याला कामया संकल्पनेवर आधारीत ही योजना आहे. गत तीन वर्षात जिल्ह्यात नरेगा अंतर्गत 28 हजार कामे पूर्ण करण्यात आली . यात मजूरी म्हणून स्थानिक मजुरांना 193 कोटी रुपये अदा करण्यात आले आहे.
1972 मध्ये राज्यात अतिभीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांना खाण्यासाठी अन्नधान्य मिळत नव्हते. तसेच त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे नव्हते. लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला तर मिळणा-या मजुरीतून त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालू शकतो, अशी संकल्पना त्यावेळेस समोर आली. शिवाय दुष्काळी परिस्थितीवर काही प्रमाणात मात करण्यास मदत होईल, या उद्देशाने 1972 मध्ये वि.स.पागे यांच्या संकल्पनेतून रोजगार हमी योजनेचा जन्म झाला. राज्याच्या या योजनेची दखल केंद्र स्तरावर घेण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने ती सर्वत्र प्रचलित झाली. गत तीन वर्षात केंद्र सरकारनेसुध्दा या योजनेसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे लोकांच्या हाताला काम देणा-या या योजनेचे संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) कौतुक केले आहे.
या योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात गत तीन वर्षात 28 हजार 160 कामे पूर्ण करण्यात आली आहे. यात सन 2014-15 मध्ये जिल्ह्यातील 361 ग्रामपंचायतीत 7 हजार 220 कामे, सन 2015-16 मध्ये 655 ग्रामपंचायतीत 5 हजार 326 कामे आणि सन 2016-17 मध्ये 1092 ग्रामपंचायतीत 15 हजार 614 कामांचा समावेश आहे. या माध्यमातून जिल्ह्यात तीन वर्षात एकूण 4 लक्ष 83 हजार 816 नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यात सन 2014-15 मध्ये 1 लक्ष 6 हजार 463 मजुरांना रोजगार मिळाला असून त्याचा मोबदला म्हणून त्यांना 50 कोटी 81 लक्ष रुपये मजूरी देण्यात आली आहे. सन 2015-16 मध्ये 1 लक्ष 69 हजार 15 मजुरांना 70 कोटी 36 लक्ष रुपये तर 2016-17 मध्ये 2 लक्ष 8 हजार 338 मजुरांना 72 कोटी 20 लक्ष रुपये मजुरी देण्यात आली आहे. गत तीन वर्षात एकूण 193 कोटी 37 लक्ष रुपये मजुरांना कामाचा मोबदला मिळाला आहे.
या योजनेंतर्गत वर्षातील 100 दिवस केंद्र सरकारतर्फे तर उर्वरीत 265 दिवस राज्य सरकारतर्फे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या कामासाठी प्रतिदिन प्रतिव्यक्ती 192 रुपये मजुरी होती. मात्र आता ती वाढवून 201 रुपये करण्यात आली आहे. सन 2016-17 या वर्षामध्ये जिल्ह्यात धडक व नरेगा सिंचन विहिरीअंतर्गत एकूण 3 हजार 408 सिंचन विहिरी पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसेच धडक सिंचन विहीर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याला प्रती तालुका 300 धडक सिंचन विहिरींचा अतिरिक्त लक्षांक मंजूर झाला आहे.
सन 2016-17 ते 2017-18 या वर्षांकरीता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजना – 11 कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात अहिल्यादेवी सिंचन विहीर, अमृतकुंड शेततळे, भुसंजीवनी नाडेप कंपोस्टिंग, भुसंजीवनी व्हर्मी कंपोस्टिंग, निर्मल शौच्छालय, निर्मल शोष खड्डे, अंकूर रोपवाटिका, कल्पवृक्ष फळबाग लागवड, नंदनवन वृक्ष लागवड, संगोपन व संरक्षण, समृध्द गाव तलाव व इतर जलसंधारणाची कामे आणि ग्रामसबलीकरण समृध्द ग्राम योजना ही कामे हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे सन 2017-18 मध्ये यवतमाळ जिल्ह्याने 19 हजार 877 नवीन कामे सुरू केली असून ती राज्यात सर्वाधिक आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी