जिल्ह्यात वृक्ष लागवडीकरीता 60 लक्ष रोपे उपलब्ध



v 13 कोटी वृक्ष लागवडीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते आज शुभारंभ
यवतमाळ, दि. 30 : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. यात यवतमाळ जिल्ह्याला 59.17  लक्ष वृक्ष लागवडीचे उदिृष्ट देण्यात आले आहेत. यासाठी जिल्ह्यात 60.03 लक्ष रोपे लागवडीकरीता उपलब्ध आहेत. वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते 1 जुलै रोजी होणार आहे. वनविभागाच्या वतीने शहरालगत विकसीत होत असलेल्या ऑक्सीजन पार्कवर होणार ‘माझं यवतमाळ, माझं झाड’ या संकल्पनेतून एकाच वेळी पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 14 लक्ष 17 हजार हेक्टर असून जिल्ह्याचे वनक्षेत्र 2 लक्ष 18 हजार हेक्टर आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 16 टक्के वनाच्छादन जिल्ह्यात आहे. पर्यावरणाचे संतुलन व समतोल राखण्यासाठी आणि टिकविण्यासाठी हे प्रमाण कमीत कमी 33 टक्क्यांपर्यंत असणे गरजेचे आहे. या बाबींचा विचार करून शासनाचे विविध विभाग व जनेतेच्या सहभागातून संपूर्ण राज्यात 1 ते 31 जुलै 2018 या कालावधीत 13 कोटी वृक्ष लागवड हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे.
यवतमाळ जिल्ह्याला या कालावधीत 59.17 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. यात यवतमाळ वनविभागाला 10 लक्ष 50 हजार वृक्ष लागवड, पुसद वनविभाग 7 लक्ष 50 हजार, पांढरकवडा वनविभाग 8 लक्ष 25 हजार, सामाजिक वनीकरण 6 लक्ष, वन विकास महामंडळ 9 लक्ष 36 हजार असे यवतमाळ जिल्ह्यातील वन विभागाला एकूण 41 लक्ष 61 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर उर्वरीत 18 लक्ष 42 हजारांचे उद्दिष्ट जिल्ह्यातील इतर विभागांसाठी आहे. यात ग्रामपंचायतींना 13 लक्ष 2 हजार, कृषी विभागाला 2 लक्ष 14 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात 2018 च्या पावसाळ्यात लागवडीकरीता 60.03 लक्ष रोपे उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात 104 रोपवाटिका असून 59.82 लक्ष उंच रोपे शिल्लक आहेत. एकूण 119 लक्ष रोपांपैकी 93.49 लक्ष रोपे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत तयार करण्यात आली आहेत. यात साग, कडूनिंब, बांबू, आवळा, चिंच, करंज, जांभुळ, शिसू, वड, सिताफळ, ऐन, बेहळा, बेल, बोर या प्रजातींची रोपे उपलब्ध आहे. तसेच सामाजिक वनीकरण विभागामार्फत बेंबळा प्रकल्प येथे 10 हेक्टर क्षेत्रावर 4 हजार अर्जुन वृक्षांची प्रायोगिक तत्वावर लागवड करण्याचे नियोजन आहे.
जिल्ह्यात होणा-या वृक्ष लागवड मोहिमेत नागरिक, सामाजिक संघटना आदींनी  मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी