महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी विक्री केंद्र - पालकमंत्री मदन येरावार








v यवतमाळ येथे महासमाधान शिबिर व लाभार्थी मेळावा
यवतमाळ, दि. 22 : देशात व राज्यात जवळपास 50 टक्के प्रमाण महिलांचे आहे. उद्योगासाठी महिलांना एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महिला बचत गटाची चळवळ सक्षमीकरणाकडे टाकलेले एक पाऊल आहे. यातून आर्थिक प्रगती होऊन महिला कुटुंबाला हातभार लावत आहे. बचत गटांच्या उत्पादनांना ग्राहकांकडून चांगली मागणी असते. त्यामुळे पाच कोटी रुपये खर्च करून बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी शहराच्या मध्यभागी लवकरच विक्री केंद्र तयार होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
गंगाकाशी लॉन येथे आयोजित महासमाधान शिबिर व लाभार्थी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, समाजाकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, नगरसेविका कीर्ति राऊत, तहसीलदार सचिन शेजाळ, डॉ. प्रमोद यादगिरवार, पूनम जाजू आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाला चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानिमित्त विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या संकल्पनेवर सरकारची वाटचाल सुरू आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, यापूर्वी संपूर्ण जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, जनधन, सौभाग्य आदी योजनांचे मेळावे घेतले. मात्र नागरिकांना स्टॉलद्वारे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणे, योजनांचा लाभ देणे, या उद्देशाने महासमाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशाप्रकारचे शिबिर व मेळावे प्रत्येक तालुकास्तरावर घेण्याचे नियोजन आहे. सरकारच्या योजना नागरिकांसाठी आहे. शासन-प्रशासन यांच्या समन्वयातूनच समाजाचा विकास होऊ शकतो. प्रत्येकाने घरकूल, श्रावणबाळ, मजूरांच्या कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवावी.
डिसेंबर 2018 अखेरपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ऑप्टीक फायबरचे जाळे विणण्यात येणार आहे. या माध्यमातून सर्व ग्रामपंचायती ऑनलाईन होतील. त्यामुळे नागरिकांना कोणतेही कागदपत्र स्थानिक ग्रामपंचायतीमूधून मिळण्यास मदत होईल. या मेळाव्यासाठी विविध विभागाच्या अधिकारी – कर्मचा-यांनी अत्यंत कमी वेळात चांगली तयारी केल्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत. मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, धडक सिंचन विहिरी, कौशल्यविकास आदी योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजाणी सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक मजूरांची नोंदणी विविध मेळाव्यातून करण्यात आल्याने कामगार विभागाच्या विविध योजनांचा त्यांना लाभ त्यांना मिळत आहे. हिरे खाणकाम करण्याचे प्रशिक्षण यवतमाळमध्ये देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. तालुक्यातील मडकोना, शिवणी, बरबडा या गावांचा वॉटर कप स्पर्धेत राज्यस्तरावर समावेश झाल्यामुळे या गावक-यांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य करणारे यवतमाळचे तहसीलदार सचिन शेजाळ, महिला आर्थिक विकास महामंडळाचे रंजन वानखेडे, जिल्हा कामगार अधिकारी राजदीप धुर्वे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या विभागांच्या योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी, गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी, वॉटर कप स्पर्धेत सहभागी पदाधिकारी आदींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यात सुवर्णा ढोमणे, सीमा वाणी, वंदना नेवारे, ज्ञानेश्वर कोहाडे, जगदीश भुजाडे, संविधान बचत गट, भीमरत्न बचत गट, तेजय कांबळे, आरती पुनवटकर, शुभदा तारसे आदींचा समावेश होता. यावेळी कृषी विभाग, सामाजिक न्याय विभाग, रेशीम विकास कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला व बालकल्याण विभाग, सामाजिक न्याय विभाग, समाजकल्याण विभाग, कामगार विभाग, पशुसंवर्धन विभाग आदी विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार सचिन शेजाळ तर संचालन कैलास राऊत यांनी केले. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी अमित राठोड, शिक्षणाधिकारी (प्राथ) सुचिता पाटेकर, महिला व बालकल्याण अधिकारी विशाल जाधव, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त किशोर भोयर, समाज कल्याण अधिकारी मंगला मून यांच्यासह विविध गावांचे सरपंच, नागरिक, विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी