टेक्सटाईल पार्कमध्ये सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प त्वरीत पूर्ण करा



v जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
यवतमाळ, दि. 25 : येथील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामध्ये विकसीत होणारा टेक्सटाईल पार्क जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. येथे पायाभूत सुविधांची कामे पूर्णत्वास आली असून सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्प त्वरीत पूर्ण केल्यास गुंतवणुकदार येथे आकर्षित होतील, त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अमरावती येथील अधिक्षक अभियंता जे.व्ही. कांगणे, उपअभियंता एच.डी.कुलकर्णी, क्षेत्र व्यवस्थापक आर.व्ही. गायकी, जी.एस. डोईजड आदी उपस्थित होते.
रोजगाराच्या व दळणवळणाच्या दृष्टीने टेक्सटाईल पार्क अत्यंत महत्वाचा आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यातून जाणारे दोन राष्ट्रीय महामार्ग, लगतचा समृध्दी महामार्ग, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग यामुळे येथे दळणवळणाच्या सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. येथील औद्योगिक क्षेत्राकरीता 132 केव्ही मधून विद्युत लाईन देण्यात आली असून टेक्सटाईल पार्ककरीता विशेष 11 केव्ही ची लाईन टाकण्यात आली आहे. यवतमाळ हा कापसाकरीता प्रसिध्द जिल्हा आहे. राज्यातील एकूण कापूस उत्पादनाच्या 27 टक्के कापूस यवतमाळ जिल्ह्यात होतो. त्यामुळे कापसावर आधारीत उद्योग येथे येणे गरजेचे आहे. अधिका-यांनी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधांची माहिती, टेक्सटाईल धोरण सांगणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
अतिरिक्त यवतमाळ औद्योगिक क्षेत्रातील 93 हेक्टरवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत टेक्सटाईल पार्क विकसीत करण्यात येत आहे. सदर क्षेत्रात एकूण 13 भुखंड आरेखित करण्यात आले आहे. पायाभूत सुविधांमध्ये 427.39 लक्ष रुपये खर्च करून डांबरी रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. जलवाहिणी टाकण्याचे काम पूर्ण झाले असून यासाठी 63.92 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. पथदिवे लावण्याचे काम 33.64 लक्ष रुपये तर विद्युत वाहिणी टाकण्याचे काम 86.14 लक्ष रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आले आहे. या टेक्सटाईल पार्कमध्ये दोन दललिटर्स क्षमतेचा औद्योगिक सांडपाणी प्रकल्प प्रस्तावित आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी