रेशीम उद्योगातून शेतक-यांची आर्थिक प्रगती


v विठोली येथे जिल्हाधिका-यांनी केली तूतीची लागवड


यवतमाळ, दि. 20 : यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 10 लक्ष हेक्टर जमीन लागवडीयोग्य आहे. मात्र खरीप आणि रब्बीचा विचार केला तर केवळ कापूस आणि सोयाबीनकडेच शेतक-यांचा कल दिसतो. हवामानाचा असमतोल बघता शेतक-यांनी शेतीपूरक उद्योगाकडे वळणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी रेशीम उद्योग हा एक चांगला पर्याय आहे. जिल्ह्याचे हवामान व वातावरण या उद्योगासाठी अनुकूल असल्यामुळे शेतक-यांची आर्थिक प्रगती होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
दिग्रस तालुक्यातील विठोली येथे रविंद्र राऊत यांच्या शेतात आयोजित कार्यशाळेदरम्यान तुतीची लागवड करतांना ते बोलत होते. यावेळी अमरावती येथील प्रादेशिक रेशीम कार्यालयाचे सहायक संचालक महेंद्र ढवळे, दिग्रसचे तहसीलदार किशोर बागडे, गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत, जिल्हा रेशीम विकास अधिकारी पंडीत चौगुले आदी उपस्थित होते.
तूती लागवडीमध्ये यवतमाळ राज्यात प्रथम असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, संपूर्ण राज्यात एकूण 18 हजार एकरवर तुतीची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी एकट्या यवतमाळ जिल्ह्यात राज्याच्या 11 टक्के म्हणजे 2 हजार एकरवर तूतीची लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतक-यांना रेशीम लागवडीचा फायदा होऊ शकतो, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यासाठी सर्व घटक, शासकीय यंत्रणा यासोबतच शेतक-यांचे योगदान महत्वाचे आहे. सुरवातीला जिल्ह्याला 500 एकरचे उद्दिष्ट होते. मात्र हे उद्दिष्ट 2 हजार एकरपर्यंत वाढविण्यात आले. त्यासाठी 70 लक्ष रोपे उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील हवामान या शेतीसाठी अनुकूल असल्यामुळे तूती लागवडीकरीता शेतक-यांना मार्गदर्शन करा. तूतीचे चांगले संगोपन झाले तर एका वर्षात या पिकाच्या 4-5 बॅच आपण घेऊ शकतो.
रेशीम उद्योग हा पर्यावरणपूरक आहे. यावर्षीच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत जिल्ह्यात 1 कोटी 10 लक्ष रोपे तूतीची लावण्यात येणार आहे. त्यामुळे एकप्रकारे पर्यावरणाचे रक्षण शेतक-यांकडून होणार आहे. इतर पिकांच्या तुलनेत तूतीला कमी पाणी लागते. शिवाय कमी खर्चात जास्त उत्पनाची हमी असल्यामुळे शेतक-यांनी तूतीच्या लागवडीकडे मोठ्या संख्येने वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. येथील अनिकेत संस्थेला रेशीम उद्योगासाठी आवश्यक चॉकी सेंटर देण्यात येईल. त्यामुळे शेतक-यांना त्याचा फायदा होईल. तूतीपासून धागा, धाग्यापासून कपडा तयार झाला तर आर्थिक चित्र नक्कीच बदलू शकते. त्यासाठी शासनाकडूनसुध्दा पाठबळ मिळत आहे. शासनाने जालन्यात खरेदी केंद्र सुरू केले आहे, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनीसुध्दा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेशीम विकास अधिकारी पंडीत चौगुले यांनी केले. संचालन किरण बारशे यांनी तर आभार अमीन चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी बलदेव राठोड, प्रगतशील शेतकरी रामभाऊ मारशेटवार, सुरेश पतंगराव, तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी