आपत्तीग्रस्त मृतकांच्या कुटुंबियांना त्वरीत मदत द्या




v महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले आदेश
v आलेगाव येथे कुटुंबियांची घेतली भेट
यवतमाळ, दि. 25 : दुर्घटना ही कधी सांगून येत नाही. 19 जून रोजी बाभुळगाव तालुक्यातील आलेगाव येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन नागरिकांचा दुर्देवी मृत्यु झाला. या कुटुंबाचे झालेले नुकसान भरून काढता येणे शक्य नाही. मात्र अशा या दु:खाच्या वेळी शासन आपल्या पाठीशी आहे, असा दिलासा देत या आपत्तीग्रस्तांना त्वरीत शासकीय मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले.
बाभुळगाव तालुक्यातील आलेगाव येथील सुधीर राठोड व तुळशीराम राठोड यांच्या अंगावर घराचा स्लॅब कोसळल्यामुळे त्यांचा या घटनेत मृत्यु झाला. त्यांच्या कुटुंबियांची महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आलेगाव येथे भेट घेतली, यावेळी ते बोलत होते.
मृतक सुधीर व तुळशीराम राठोड यांना शासनाकडून पाहिजे ती मदत त्वरीत उपलब्ध करून देऊ. सदर कुटुंबांचा घरकुलच्या यादीत समावेश आहे का, अशी विचारणा राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली. नसेल तर घरकुलच्या ‘ड’ यादीत समावेश करावा. तसेच राष्ट्रीय कुटुंब सहाय्यता योजनेमध्ये त्यांना मदत देण्याचे नियोजन करा. परिसरात अतिवृष्टीमुळे झालेले विद्युत खांबांचे नुकसान, पाणी पुरवठा, झोपडपट्टीची विद्युत लाईन युध्दस्तरावर त्वरीत सुरू करा,अशा सुचना महसूल राज्यमंत्र्यांनी केल्या. यावेळी त्यांनी दोन्ही कुटुंबियांना वैयक्तिक आर्थिक मदत केली.
तसेच या घटनेत जखमी झालेले उषा आडे, सुमन पवार, किसन राठोड आदींची विचारपूस केली. जखमींनासुध्दा शासकीय मदत देण्याचे प्रयोजन करा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, विद्युत विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी आदी उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी