शासनाची अनेक धोरणे राजर्षी शाहूंनी दाखविलेल्या मार्गानुसार - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख



v जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय दिन
यवतमाळ, दि. 26 : आदर्श राज्य कसे चालवावे, याची प्रत्यक्ष कृतीतून शिकवण देणारे राजर्षी शाहू महाराज हे ख-या अर्थाने लोकराजे होते. समाजात समतेची, न्यायाची अंमलबजावणी करणारे त्यांचे पहिले  राज्य होते. शासनाच्या अनेक धोरणांची वाटचाल शाहू महाराजांनी दाखविलेल्या मार्गानुसार सुरू आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक न्याय दिनानिमित्त राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करतांना ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, खनिकर्म अधिकारी श्री. गोसावी उपस्थित होते.
समाज घटकांशी निगडीत अनेक महत्वाचे निर्णय शाहू महाराजांनी घेतले, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नाही, अशा पालकांना त्यांनी दंडसुध्दा ठोठाविला. स्त्री शिक्षणाच्या प्रसार, अस्पृश्यता निर्मुलन, प्रत्यक्ष व्यवसाय शिक्षणाची सुरूवात, दुर्बल घटकांना आरक्षण, पुनर्विवाहाचा कायदा यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. शेतक-यांसाठी त्यांनी गुळाची बाजारपेठ सुरू केली. त्यांनी बांधलेले राधानगरी धरण आधुनिक तंत्रज्ञानाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पाण्याच्या स्तरानुसार धरणाचे गेट आपोआप उघडते व स्तर कमी झाला की लगेच बंद होते, असे तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात आले आहे. शाहू महाराजांचे कोणतेही निर्णय आधुनिकतेपासून दूर नव्हते. सुजलाम, सुफलाम राज्य आणि समानतेच्या विचारांनी बांधणारे त्यांचे कर्तृत्व होते. त्यांच्या विचारावर चालण्याची सर्वांना गरज आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
यावेळी नायब तहसीलदार डी.एम.राठोड यांनी शाहू महाराजांचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडला. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी