पीककर्ज वाटपात बँकांची दिरंगाई सहन केली जाणार नाही

                                  
v जिल्हाधिका-यांनी घेतली बँकर्सची बैठक
यवतमाळ, दि. 6 : राज्यासह जिल्ह्यात मान्सुनच्या पावसाचे वेध लागले असून शेतकरी खरीपाच्या तयारीला लागला आहे. यावेळेस शेतक-यांना पीककर्ज मिळणे गरजेचे आहे. मात्र यात बँकांची प्रगती समाधानकारक नाही. त्यामुळे शेतक-यांना दिलासा देण्यासाठी बँकांनी कर्जवाटपाला गांभिर्याने घ्यावे. यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पीककर्ज वाटपासंदर्भात आयोजित बँकर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक जयंत घोडखांदे, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपक्षेत्रीय व्यवस्थापक शिवप्रसाद मोदीगंटे, विदर्भ कोकण बँकेचे गौतम ताकसांडे, एसबीआयचे आशिष गंजेवाले, महाराष्ट्र बँकेचे जी.बी.कोरडे, अमोल मोरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे, जिल्हा अग्रणी बँकेचे सचिन नारायणे आदी उपस्थित होते.
यवतमाळ जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, गतवर्षी कमी पाऊस, बोंडअळी, किटकनाशक फवारणी अशा अनेक संकटांचा सामना जिल्ह्याला करावा लागला. शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कर्जमाफी दिली. कर्जमाफीची रक्कम बँकांमध्ये जमासुध्दा करण्यात आली. त्यामुळे शेतक-यांना नवीन पीककर्ज वाटपात कोणतीही अडचण नाही. पीक कर्ज वाटपाबाबत जिल्हा प्रशासनाकडून नियमित आढावा घेणे सुरू आहे. त्यामुळे कोणत्या बँकेची काय परिस्थिती आहे, ते नियमित कळते. कर्जवाटपात तुघलकी धोरण न राबविता शेतक-यांना सुलभ कर्जवाटप कसे होईल, त्यावर लक्ष केंद्रीत करा. तसेच कर्जवाटपाचा नियमित प्रगती अहवाल जिल्हा अग्रणी बँकेकडे सादर करणे गरजेचे आहे. ज्या बँका चांगले काम करतील त्यांचे कौतुक करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कर्जमाफीच्या शेतक-यांना मूळ मुद्दल रकमेऐवढे कर्जवाटप करण्यात येणार असल्याचे बॅकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे यांनी सांगितले.
यावर्षी जिल्ह्यात खरीपाचे नियोजन 2 हजार 78 कोटींचे करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 523 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यंत त्यांनी 209 कोटींचे वाटप केले आहे. ही टक्केवारी 40 आहे. मात्र उर्वरीत बँकेचे सरासरी कर्जवाटप केवळ 16 टक्के आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 45 शाखा असून त्यांना 571 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एसबीआयने आतापर्यंत 35 कोटींचे (6 टक्के)  वाटप केले आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 175 कोटी उद्दिष्टापैकी 13 कोटी (7 टक्के), बँक ऑफ बडोदा 65 कोटी उद्दिष्टापैकी 2 कोटी (4 टक्के), बँक ऑफ इंडिया 84 कोटी उद्दिष्टापैकी 83 लक्ष (0.9 टक्के), बँक ऑफ महाराष्ट्र 216 कोटी उद्दिष्टापैकी 9 कोटी (4.5 टक्के), युबीआय 129 कोटी उद्दिष्टापैकी 35 कोटी (27 टक्के) वाटप केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी