पीककर्ज वाटपाबाबत गतिमान प्रक्रिया राबवा - महसूल राज्यमंत्री संजय राठोड




v विविध विषयांचा घेतला आढावा
यवतमाळ, दि. 15 : खरीप हंगामात शेतक-यांना कर्जवाटप होणे गरजेचे आहे. एकही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहता कामा नये. जिल्हा प्रशासनाने याबाबत पुढाकार घेतला आहे. तरीसुध्दा शेतक-यांना वेळेत कर्ज उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ही प्रक्रिया अधिक गतीमान पध्दतीने राबवावी, अशा सुचना महसूल राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय राठोड यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विषयांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, नितीने हिंगोले, स्वप्नील तांगडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.राठोड, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त किशोर भोयर आदी उपस्थित होते.
आतापर्यंत जिल्ह्यात विविध बँकांकडून किती टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले आहे, अशी विचारणा करून महसूल राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले, शेतक-यांसाठी हा हंगाम महत्वाचा आहे. त्यामुळे बँकांनी पात्र शेतक-यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच जिल्हादंडाधिकारी म्हणून प्रशासनाने ही प्रक्रिया राबवावी. दिग्रस तालुक्यात इटोळा धरणाचे पाणी काही शेतक-यांच्या शेतात राहत असल्याने त्यांना शेती करता येत नाही. त्यामुळे याबाबत जलसंपदा विभाग, महसूल व वन विभागाने वस्तुस्थिती अहवाल सादर करावा. दिग्रस नगर पालिका अंतर्गत बांधण्यात येणारे घरकुल त्वरीत पूर्ण करावे. तसेच बांधकामाचा दर्जा, सद्यस्थितीचा अहवाल, ऑडिट रिपोर्ट आदी बाबी तपासून त्वरीत मागवावे.
अरुणावती आणि बेंबळा येथील मत्स्यबीज केंद्राकरीता दहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या केंद्राचा जिल्ह्याला फायदा झाला पाहिजे. अरुणावती येथील केंद्रासाठी 3 कोटी 66 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. हे केंद्र भाडेपट्टीने देण्याबाबतच्या प्रस्तावाचा संबंधित विभागाने पाठपुरावा करावा. दारव्हा येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहाच्या जमिनीचा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा, अशा सुचना सहपालकमंत्र्यांनी केल्या. यावेळी त्यांनी इटोळा प्रकल्प, घरकूल बांधकाम, नेर नगर पालिका अंतर्गत गाळे बांधकाम, नेर, दिग्रस, दारव्हा तालुक्यातील पालकमंत्री शेत पांदण रस्ते, नेर वळण रस्ता, तहसील कार्यालय बांधकाम, राजूरा आणि माणिकवाडा येथील मुक्त वसाहत योजना, पीक कर्जवाटप आदी विषयांचा आढावा घेतला.
जिल्ह्यात आतापर्यंत 400 कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात ही टक्केवारी 21 असून महिन्याअखेर 50 टक्के कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. काल एकाच दिवसात जवळपास 15 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात रोज सायंकाळी पीक कर्जवाटपाचा आढावा घेतला जातो, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बैठकीत दिली.
यावेळी नेर, दिग्रस, दारव्हा तालुक्याचे तहसीलदार, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी