‘वन से धन तक’ या संकल्पनेनुसार वृक्षलागवड व मुद्रा योजना राबवा




v अर्थ तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हीसीद्वारे साधला संवाद
v यवतमाळमध्ये साकारणा-या ऑक्सीजन पार्कचे केले कौतुक 
यवतमाळ, दि. 18 : राज्य शासनाने हाती घेतलेली वृक्ष लागवड मोहीम ही लोकचळवळ झाली आहे. या मोहिमेबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याचे निदर्शनास येते. तसेच 2018-19 मध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचे तीन लक्ष कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात महाराष्ट्राचा वाटा 50 हजार कोटी रुपयांचा राहणार आहे. या दोन्ही महत्वकांक्षी योजना आपापल्या जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने ‘वन से धन तक’ ही संकल्पना राबवावी, अशा सुचना अर्थ व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात 13 कोटी वृक्ष लागवड मोहीम व प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा व्हीसीद्वारे आढावा घेतांना ते बोलत होते. वृक्ष लागवड मोहिमेत पारदर्शकता आवश्यक आहे, असे सांगून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, टिकाकारांना संधी देऊ नका. पारदर्शकपणे सर्व गोष्टी नागरिकांना उपलब्ध करून द्या. 1 ते 31 जुलैपर्यंत या उपक्रमाची चांगली अंमलबजावणी करायची आहे. त्यानंतर वृक्षांच्या संवर्धनावर भर द्या. वृक्ष लागवड मोहिमेदरम्यान यवतमाळ मध्ये साकारण्यात येणारे ‘ऑक्सीजन पार्क’ ही संकल्पना नाविण्यपूर्ण व चांगली आहे. तसेच जिल्ह्यात उज्वला गॅस योजनेंतर्गत ‘एक गॅस एक वृक्ष’ ही संकल्पना राबवावी. जिल्ह्याचा आराखडा तयार करतांना वृक्ष लागवडीसाठी शहराचासुध्दा आराखडा पालिकेने तयार करावा. जलयुक्त शिवारला वनयुक्त शिवारमध्ये बदलवा. स्मशानभुमीत तसेच शाळेच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वनऔषधी लावण्याचे नियोजन करा.
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा आढावा घेतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मुद्रा बँक जिल्हा नियेाजन समन्वय समितीमध्ये अशासकीय सदस्यांनी त्वरीत नेमणूक करा. या सदस्यांना ओळखपत्र देण्यात यावे. बँकेच्या अधिका-यांशी चर्चा करून आयईसी प्लान तयार करावा. मुद्रा अंतर्गत दिलेले उद्दिष्ट सर्व बँकांनी पूर्ण करावे. तसेच या योजनेच्या सर्व छोट्या छोट्या घटकांची माहिती संबंधितांनी जाणून घ्यावी, अशा सुचना अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्याला 59.17 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे सांगितले. हे उदिृष्ट राज्यात चवथ्या क्रमांकाचे असून आतापर्यंत जिल्ह्यात 55.88 लक्ष खड्डे पूर्ण करण्यात आले आहे. वणी तालुक्यात खनीज विकास निधीमधून 50 हजार रोपे देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील 42 शेतकरी 120 एकरवर तीन लक्ष निलगीरीची झाडे लावणार आहेत. जिल्ह्यात एकूण 117 लक्ष रोपे उपलब्ध असून यापैकी नरेगा अंतर्गत 93 हजार रोपे उपलब्ध झाली आहे. शहरालगत 25 एकरवर ऑक्सीजन पार्क करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी वन पर्यटनातून 60 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘माझ वन, माझं झाड’ या संकल्पनेंतून एकाच दिवशी 4 हजार झाडे लावण्यात येणार असून अनेक सामाजिक संस्थांना या मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, अरविंद मुढे, श्रीमती अभर्णा, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी.राठोड, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन आदी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी