सामाजिक समतेच्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे - जि.प. अध्यक्षा माधुरी आडे





v सामाजिक न्याय दिनानिमित्त विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव
यवतमाळ, दि. 26 : छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी जगाला समतेची शिकवण दिली. दूरदृष्टी असलेल्या या लोकनेत्याने समाजातील दुर्बल, मागासलेल्या घटकांसाठी अनेक धोरणे राबविली. यात आरक्षण, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, विधवा पुनर्विवाहाचा कायदा, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, अस्पृश्यता निर्मुलन आदींचा समावेश आहे. त्यांनी सांगितलेल्या सामाजिक समतेच्या विचारांची आजही आवश्यकता आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे यांनी केले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जि.प. समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक उपायुक्त किशोर भोयर, जात पडताळणी समितीचे उपायुक्त सुनील वारे, न.प.आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, अनिल आडे आदी उपस्थित होते.
शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे जनक होते. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने वाटचाल करणे  व समाजामध्ये सामाजिक सलोखा ठेवण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. शाहू महाराजांचा विचार निरंतर समोर नेण्याची गरज आहे, असे अध्यक्षा माधुरी आडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, शाहू महाराजांनी राज्य, देश आणि जगासाठी लोककल्याणकारी मार्गाचा आदर्श निर्माण केला. तसेच राज्यकारभार कसा चालवावा, याचा धडा त्यांनी घालून दिला. राजर्षी शाहूंनी केवळ 28 वर्षे राज्यकारभार केला. मात्र त्यांच्या धोरणांमुळे 28 युगांचे भले झाले आहे. समाजातील सर्व घटकांना समानतेची वागणूक मिळावी, यावर त्यांचा कटाक्ष असे. शेती, उद्योग, सहकार, कला आदींना त्यांनी राजाश्रय दिला. सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजना असून जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी चांगल्या पध्दतीने होत आहे. विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेऊन या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. नगराध्यक्षा कांचन चौधरी म्हणाल्या, भारतीय राज्यघटनेने आपल्याला न्याय, समता, स्वातंत्र दिले आहे. सर्व घटकांचा सन्मान राखणे ही आपली जबाबदारी आहे. राज्य शासनाने प्लॅस्टिक निर्मुलनाचे धोरण हाती घेतले आहे. यवतमाळकरांनी या मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्राविण्य मिळविणारे अनिकेत निकाडे, किरण जमधाडे, मेघा मुरादे, गितांजली वाघमारे, यश चव्हाण, रोहित जाधव, सलोनी खोब्रागडे, प्रज्वल मुनेश्वर, दिव्यानी डहाके, पल्लवी खैरमोडे यांना राजर्षी शाहू महाराज गुणवंत पुरस्कार, अर्चना गेडे, वैष्णवी गजभिये, संदीप खंदारे यांना स्वाधार योजनेंतर्गत पुरस्कार देण्यात आला. तसेच वैभव गोरे व अभिषेक पोटे यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी अनुसूचित जाती निवासी शाळेचे शिक्षक एस.एस.पडाळ, शिक्षिका एम.बी. भोयर आणि श्रीमती भरजाडे यांचासुध्दा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सहायक उपायुक्त किशोर भोयर यांनी केले. संचालन प्रा. कमल राठोड यांनी तर आभार जि.प. समाजकल्याण अधिकारी मंगला मून यांनी मानले. कार्यक्रमाला माजी समाजकल्याण अधिकारी गवई, दलितमित्र पुरस्कार प्राप्त शिवराम करके, देवण्णा पालेवाल, श्रावण सोनोने, प्रल्हाद सिडाम, भगवान मुदाने आणि अण्णाभाऊ साठे पुरस्कारप्राप्त केशव लोढे यांच्यासह अनुसूचित जाती निवासी आश्रमशाळेचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी