वीज बचतीसाठी पालिका क्षेत्रातील पथदिवे ‘एलईडी’ ने उजळणार




v सर्व पालिकांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ईएसएल कंपनीसोबत करार
यवतमाळ, दि. 29 : विजेची बचत ही काळाची गरज आहे. संपूर्ण जिल्ह्यातील पालिका क्षेत्रात असलेले पथदिवे आता ‘एलईडी’ ने उजळणार असून यासाठी पालकमंत्री मदन येरावार यांनी पुढाकार घेतला आहे. वीज बचत व सोबत लख्ख प्रकाश मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पालिकांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एनर्जी इफिशिएंन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईएसएल) या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत ग्रेटर नोएडा स्थित ईएसएल कंपनीचे महाराष्ट्राचे उपमहाव्यवस्थापक नरेंद्र सैनी आणि यवतमाळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्ष-या केल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अधिक्षक अभियंता राजेंद्र काटपिल्लेवार, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, जिल्हा नियोजन अधिकारी डी.टी. राठोड उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, लोकप्रतिनिधीसोबतच शहराच्या विकासात पालिका मुख्याधिका-यांची भुमिका महत्वाची आहे. शहर विकासाचा आराखडा बनवितांना पथदिव्यांची व्यवस्था हा महत्वाचा भाग आहे. आतापर्यंत पालिकेला पथदिव्यांचे भरमसाठ बिल येत होते. आता मात्र ‘एलईडी’ च्या माध्यमातून विजेची बचत तर होणारच आहे शिवाय पालिकेचे वीज बिलाचे पैसेसुध्दा वाचणार आहे. पालिका क्षेत्रातील रस्ते रात्रीच्या वेळी प्रकाशमय राहणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले. मात्र कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास संबंधित कंपनीने त्यांचा समन्वयक येथे कायमस्वरुपी नेमून द्यावा, असे आदेश यावेळी त्यांनी दिले.  
वीज बचतीकरीता ईएसएल ही कंपनी केंद्र शासनासोबत संयुक्तरित्या कार्यरत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 20 लक्ष पथदिवे या कंपनीच्या माध्यमातून बदलविण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सोळा नगर पालिका क्षेत्रातील संपूर्ण पथदिवे आता ‘एलईडी’ ने उजळणार आहेत. सुरवातीला पालिका क्षेत्राचा सर्व्हे करून संपूर्ण प्रकल्प तीन ते चार महिन्यात कंपनीकडून पूर्ण करण्यात येणार आहे. सात वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्तीचा खर्च सदर कंपनीतर्फे करण्यात येईल.
यावेळी जिल्ह्यातील अ, ब आणि क नगर पालिकांच्या मुख्याधिका-यांनी ईएसएल कंपनीसोबत सामंजस्य करार केला.  बैठकीला पालिकांचे मुख्याधिकारी, ईएसएल कंपनीचे अभियंता अमित चोपडे, प्रसन्न काटकर, संजय आठवले आदी उपस्थित होते.
000000



 



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी