महिला बचत गटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी - पालकमंत्री मदन येरावार





v कळंब येथे स्वयं सहायता समुह व ग्राम संघांना 6 कोटींचे धनादेश वाटप
v बचत गटांच्या उत्पादनांसाठी विक्री केंद्राची इमारत
यवतमाळ, दि. 30 : देशातील लोकसंख्येच्या 50 टक्के वाटा महिलांचा आहे. आजची महिला सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आदी क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिलांच्या हाती पैसा असला की मुलांचे शिक्षण, कुटुंबाची गरज आदींचे चांगल्या प्रकारे नियोजन होते. कुटुंबाच्या बाहेर महिलांनी पाऊल टाकले आहे. बचत गटाच्या माध्यमातून गावाचे आर्थिक नियोजन त्या करीत आहेत. एकप्रकारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम बचत गटांच्या माध्यमातून होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
कळंब येथील मोरया सभागृहात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने आयोजित उमेद, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयं सहायता समुह व ग्रामसंघांना निधीचे वाटप करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. अशोक उईके, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, कळंबच्या पं.स. सभपती संजीवनी कासार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
महिला बचत गटाची शक्ती मोठी आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, यापूर्वी तालुका स्तरावर महिलांचे मेळावे घेण्यात आले. महिला केवळ शिक्षित झाल्या नाही तर त्यांनी समाजाला सांभाळले आहे. शासनाकडून बचत गटांसाठी मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. शासन आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. घरगुती उद्योग, गृहपयोगी व्यवसाय, बाजाराची गरज आदी बाबी महिला बचत गटांना कळतात. कुटुंबाचे नियोजन करता करता महिला आता समाजाचे अर्थनियोजन करीत आहेत. महिला बचत गटांनी नवनवीन प्रयोग करून आधुनिक व्यवस्थापन व मार्केटिंगचे नवीन तंत्रज्ञान शिकणे काळाची गरज आहे. या माध्यमातून आणखी पैसा येईल.  बचत गटांच्या उत्पादनांना चांगली मागणी असते. त्यामुळे या उत्पादन विक्रीकरीता यवतमाळ शहरात पाच कोटी रुपये खर्च करून तीन मजली इमारत पूर्णत्वास येत आहे.
महिलांना दोन कोटी भांडवलापर्यंत उद्योग उभारायचा असेल तर त्यांना मिळणा-या कर्जावर शासनाकडून व्याज भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला सक्षम तरच समाज सक्षम राहील. बचत गटांना लागणारे अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू. शासनाच्या अनेक योजना आहेत. कौशल्यविकास, घरकुल आदींचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. 
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत घाटंजी, पांढरकवडा, झरी जामणी तालुक्यातील स्वयं सहायता समूह व ग्राम संघांना विविध योजनेतून 5 कोटी 77 लक्ष रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच कळंब तालुक्यातील 259 समुहांना 38.85 लक्ष रुपये खेळते भांडवल, बाभुळगाव तालुक्यातील 52 समुहांना 7.8 लक्ष रुपये आणि राळेगाव तालुक्यातील 41 समुहांना 6.15 लक्ष रुपये असे तीन तालुक्यातील एकूण 352 समुहांना 52.8 लक्ष रुपये खेळते भांडवलचे धनादेश देण्यात आले. सामुदायिक निधी अंतर्गत घाटंजी तालुक्यातील 278 समुहांना 166.8 लक्ष रुपये, बाभुळगाव तालुक्यातील 68 समुहांना 40.8 लक्ष रुपये आणि राळेगाव तालुक्यातील 98 समुहांना 58.8 लक्ष रुपये असे तीन तालुक्यातील एकूण 444 समुहांना 266.4 लक्ष रुपयांचे धनादेश देण्यात आले. याशिवाय ग्रामसंघ व्यवस्थापन निधी अंतर्गत कळंब तालुक्यातील 27 ग्रामसंघांना 13.05 लक्ष रुपये, बाभुळगाव तालुक्यातील 47 ग्रामसंघांना 13.7 लक्ष रुपये आणि राळेगाव तालुक्यातील 15 ग्रामसंघांना 3.35 लक्ष रुपये असे तीन तालुक्यातील एकूण 89 ग्रामसंघांना 30.1 लक्ष रुपयांचे धनादेश देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यांनी केले. यावेळी राळेगावचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांच्यासह संबंधित तालुक्यांचे गटविकास अधिकारी, तहसीलदार, तसेच महिला बचत गटातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

  


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी