जिल्हाधिका-यांनी घेतली ग्रामविकास परिवर्तकांची बैठक


v विविध विषयांचा आढावा
यवतमाळ, दि. 6 : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत जिल्ह्यात कार्यरत ग्रामविकास परिवर्तकांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. ग्रामविकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या गावातील विविध विषयांचा व कामाच्या प्रगतीचा जिल्हाधिका-यांनी यावेळी आढावा घेतला. यात 13 कोटी वृक्ष लागवड मोहीम, घरकूल योजना, क्रिडांगण व व्यायाम शाळा विकास, स्वच्छ भारत मिशन, मस्त्यव्यवसाय, ठक्करबाप्पा योजना, सामाजिक वनीकरण, पशुसंवर्धन, कृषी समृध्दी प्रकल्प आदींचा समावेश होता.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री ग्रामविकास योजनेत समाविष्ट गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे गरजेचे आहे. त्यासाठी वनविभागाकडून मदत उपलब्ध करून दिली जाईल. या गावांसाठी विशेष ओळख म्हणून वेगळ्या प्रकारचे ट्री-गार्ड उपलब्ध करून देण्यासाठी वनविभागाने प्रयत्न करावे. तसेच वृक्ष लागवडीमध्ये फळबाग वृक्षांची लागवड केली तर गावक-यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. 2016-17 मध्ये घरकूल योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची घरे जून अखेर तर 2017-18 मधील लाभार्थ्यांची घरे जुलैअखेर पूर्ण करा. तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या व्यतिरिक्त रमाई, शबरी, कोलाम घरकूल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी अद्ययावत ठेवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करावे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ओडीएफ झालेल्या गावात घनकचरा व्यवस्थापन, ओला-सुका कचरा कंपोस्ट करणे यातून उत्कृष्ट काम होऊ शकते. ओडीएफ प्लस प्लस ही योजना सर्वांनी समजावून घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री ग्रामविकास योजनेतील गावात रेशीम लागवडीसाठी शेतक-यांना प्रोत्साहित करा. पाच एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतक-यांनासुध्दा योजनेचा लाभ मिळू शकतो. टसर सिल्क उत्पादनासाठी ऐन आणि अर्जुन झाडांची लागवड आदी बाबी शेतक-यांना समजावून सांगा, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
यावेळी त्यांनी ठक्करबाप्पा योजनेंतर्गत मंजूर झालेली कामे, मिळालेले अनुदान, कामाची स्थिती, क्रिडांगण व व्यायाम शाळा विकास योजनेंतर्गत झालेली कामे, क्रीडा साहित्याचे वाटप यासह विविध विषयांचा आढावा घेतला.
बैठकीला यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, सहायक नियोजन अधिकारी म.श. दुशिंग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे श्री. पांडे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त श्री. रामटेके, जिल्हा समन्वयक अनुजा पत्रे, बाळू राठोड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच ग्राम परिवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी