‘योगा’ला जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनवा






v आंतराष्ट्रीय योगा दिनानिमित्त पालकमंत्री येरावार यांचे आवाहन
v आयुर्वेद महाविद्यालयातून योगा दिंडीचा शुभारंभ
यवतमाळ, दि. 21 : पाच हजार वर्षापासून मोठी परंपरा असलेली योगाविद्या ही जगाला भारतीय संस्कृतीने दिलेली मौल्यवान भेट आहे. आजच्या धकाधकीच्या काळात तणावमुक्त, भयमुक्त, रोगमुक्त, निरोगी, निरामय राहण्यासाठी नियमित योग करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी योगाला जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनवावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हींग केंद्र, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बचत भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, मुख्य वनसंरक्षक श्री. राहूरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अधिक्षक अभियंता शशीकात सोनटक्के, पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष संजय चाफले, भारत स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष दिनेश राठोड, आर्ट ऑफ लिव्हींगचे राजू पडगीलवार, शंतनू शेटे, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे महेश जोशी आदी उपस्थित होते.
योग केवळ व्यायाम नाही तर दीर्घायुष्य प्रदान करण्याची एक कला आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पहिल्यांदा भारतीय योगाचे महत्व विशद केले. त्यानुसार संयुक्त राष्ट्र संघटनेने 21 जून हा आंतराष्ट्रीय योग दिन घोषित केला. गत चार वर्षांपासून विविध संघटनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर योग दिन साजरा केला जातो. नागरिकांमध्येही योगाबद्दल जागरुकता निर्माण झाली आहे. याकरीता कार्यरत असलेले राजू पडगीलवार यांच्यासह विविध सामाजिक संघटना अभिनंदनास पात्र आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला योगाचे महत्व सांगितले. त्यानुसार पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला. धकाधकीच्या तसेच अनिश्चिततेच्या काळात चांगले आरोग्य, प्रसन्न मन असणे आवश्यक आहे. स्वत:च्या प्रक्रुतीकडे नागरिकांना लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे अनेक व्याधींनी मानवाला ग्रासले आहे. यावर सर्वोत्तम पर्याय म्हणजे नियमितपणे योगा करणे. योगामुळे शारीरीक, मानसिक व अध्यात्मिक प्रसन्नता मिळते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी योगशिक्षक दिनेश राठोड, संजय चाफले, गोपाळ ढोमणे, मायाताई चव्हाण यांनी उपस्थितांना सुखासन, सुक्ष्म व्यायाम, ताडासन, वृक्षासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, उस्ट्रासन, सशकासन, वक्रासन, मक्रासन, भुजंगासन, सल्वासन, सेतूपन्नासन, अर्धहलासन, पवनमुक्तासन, सवासन, कपालभारती, अनुलोम, सितली आणि भ्रामरी प्राणायम आदींचे महत्व सांगून उपस्थितांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश राठोड यांनी केले. संचालन राजू पडगीलवार यांनी तर आभार शंतनू शेटे यांनी मानले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेंगे, शारीरिक शिक्षक संघटनेचे मनोज येंडे, जितेंद्र सातपुते, सुहास पुरी, अनाथ मुलांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेले सागर रेड्डी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आयुर्वेद महाविद्यालयातून योग दिंडीचा शुभारंभ : डायाभाई मावजी मजेठिया आयुर्वेद महाविद्यालयात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून योगा दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. सदर योग दिंडीत पतंजली योगा समिती, आर्ट ऑफ लिव्हींग, आरोग्य भारती, क्रीडा भारती, प्रयास, गुरुदेव सेवा मंडळ, रोटरी क्लब मिडटाऊन, जनार्दन योगाभ्यासी मंडळ  आदींचा समावेश होता. तत्पूर्वी येथे योगशिक्षकांनी उपस्थित नागरिकांना योगा प्रात्यक्षिके सांगितली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. केदार राठी तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री मदन येरावार उपस्थित होते. यावेळी वकृत्व स्पर्धेतील विजेते आदिती सरदार व गौरव चौधरी, निबंध स्पर्धेतील विजेते चंचल मून व पुण्याई राऊत आणि उत्कृष्ट योगासनेतील विजेते वैष्णवी खेरडे आणि गौरव चौधरी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. प्रशांत कचारे, डॉ. बनसोड, डॉ. राजेश गडीकर, डॉ. सुरेंद्र पद्मावार, अशोक गिरी, नितीन गिरी, प्रदीप वडनेरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य मुंदाले सर, आरोग्य भारतीचे राकेश मिश्रा, डॉ. चाफले, जनार्दन योगाभ्यासी मंडळाचे महेश जोशी आदी उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी