बचत गटांमुळे ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण - केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर




v घाटंजी येथे महिला बचत गट व ग्राम संघांना 5 कोटींचे धनादेश वाटप
यवतमाळ, दि. 28 : ग्रामीण भागातील महिला कमी शिक्षित असल्या तरी त्यांचे व्यवहारीक ज्ञान चांगले असते. कुटुंबाचा डोलारा सांभाळण्यासोबतच महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना गावाचे अर्थज्ञान अवगत होते. महिलांमुळे गावात बचत गटांची चळवळ चांगलीच फोफावली आहे. शासनही महिला बचत गटांच्या पाठीशी उभे आहे. एकप्रकारे हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी टाकलेले महत्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
घाटंजी येथील संत गजानन महाराज सभागृहात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचत गट व ग्राम संघांना निधीचे वाटप करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजू तोडसाम, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, घाटंजीच्या पं.स. सभपती कालिंदा आत्राम, पांढरकवडा येथील पं.स. सभापती इंदु मिसेवार, झरीजामणी येथील पं.स. सभापती लता मिसेवार आदी उपस्थित होते.
महिला बचत गटाचे काम अतिशय चांगले आहे, असे सांगून केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर म्हणाले, गटातील महिला मन लावून काम करतात. बचत गटाच्या माध्यमातून सरकारच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचण्यास मदत होते. शिवाय महिलांच्या हाती पैसा खेळत राहतो. या महिलांचे कर्तुत्व खुप मोठे आहे. महिलांना सक्षम करणे ही आज देशाची गरज आहे. त्यासाठीच बचत गटाची चळवळ हाती घेण्यात आली आहे. देशातील गरीबी संपविणे हे केंद्र शासनाचे ध्येय आहे. व्यवसायाच्या माध्यमातून महिला समोर आल्या तर गरिबी संपुष्टात येऊ शकते. ही ताकद महिलांमध्ये आहे, याची जाणीव आहे. सुरवातीला केवळ ‘चूल आणि मूल’ असेच महिलांचे विश्व होते. मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे. ग्रामीण महिलांना व्यवहार चांगला कळतो. दुध उत्पादन, गृहउद्योग, कुक्कुटपालन, शेळीपालन या शेतीपुरक व्यवसायासोबतच इत्यादी व्यवसायात महिला अग्रस्थानी आहेत.
गरिबी दूर करण्यासाठी उत्पन्न वाढणे गरजेचे आहे. शेती तसेच पुरक व्यवसायातून पैसा उभा राहतो. माणसाच्या खिशातील पैसा आता महिलांच्या पर्समध्ये येत आहे. आर्थिकदृष्ट्या तीसुध्दा सक्षम होत असल्याने महिलांचा सन्मान करणे सर्वांचे कर्तव्य आहे. पुढील चार वर्षात 100 टक्के नागरिकांना स्वत:चे घर देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेत ज्यांची घरे अपूर्ण आहेत, त्यांनी ती त्वरीत पूर्ण करावी. आवास योजनेत ज्यांचे नाव नाही, ते पुन्हा नावनोंदणी करू शकतात. शासनाच्या योजना सामान्य नागरिकांसाठी आहे. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत घाटंजी, पांढरकवडा, झरी जामणी तालुक्यातील स्वयं सहायता समूह व ग्राम संघांना विविध योजनेतून 4 कोटी 94 लक्ष रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. यात घाटंजी तालुक्यातील पिंपरी येथील नवपाऊल ग्रामसंघ, कोटो येथील नम्रता ग्रामसंघ, ससानी येथील सक्षम ग्रामसंघ, पांढरकवडा तालुक्यातील आडउमरी येथील जयसेवा ग्रामसंघ, ठोकी रोड येथील हरीओम ग्रामसंघ, तेलगटाफळी येथील संविधान ग्रामसंघ तसेच झरी जामणी तालुक्यातील सुर्दापूर येथील ताज ग्रामसंघ, गवारा येथील महात्मा फुले ग्रामसंघ, कारेगाव येथील उमेद ग्रामसंघा आदींचा समावेश आहे.
तसेच घाटंजी तालुक्यातील 76 समुहांना 11.4 लक्ष रुपये खेळते भांडवल, पांढरकवडा तालुक्यातील 94 समुहांना 14.1 लक्ष रुपये आणि झरी तालुक्यातील 142 समुहांना 21.3 लक्ष रुपये असे तीन तालुक्यातील एकूण 312 समुहांना 46.8 लक्ष रुपये खेळते भांडवलचे धनादेश देण्यात आले. सामुदायिक निधी अंतर्गत घाटंजी तालुक्यातील 57 समुहांना 34.2 लक्ष रुपये, पांढरकवडा तालुक्यातील 140 समुहांना 84 लक्ष रुपये आणि झरी तालुक्यातील 185 समुहांना 111 लक्ष रुपये असे तीन तालुक्यातील एकूण 382 समुहांना 229.2 लक्ष रुपयांचे धनादेश देण्यात आले. याशिवाय ग्रामसंघ व्यवस्थापन निधी अंतर्गत घाटंजी तालुक्यातील 28 ग्रामसंघांना 21 लक्ष रुपये, पांढरकवडा तालुक्यातील 22 ग्रामसंघांना 16.5 लक्ष रुपये आणि झरी तालुक्यातील 15 ग्रामसंघांना 11.25 लक्ष रुपये असे तीन तालुक्यातील एकूण 65 ग्रामसंघांना 48.75 लक्ष रुपयांचे धनादेश देण्यात आले. याशिवाय विविध उपजिविका निधी अंतर्गत घाटंजी तालुक्यातील कृषी सेवा संघ, सामुदायिक मत्स्यपालन व प्रोसेसिंग व्यवसायाकरीता 38 लक्ष रुपये, पांढरकवडा तालुक्यातील मध उत्पादन प्रकल्प, फुल शेती, नर्सरी व्यवस्थापन, बग मेकिंग, बटेर पालन, डाळ मिल आदींसाठी 40 लक्ष रुपये आणि झरी तालुक्यातील मध उत्पादन प्रकल्प, वन उत्पादन व मोहफूल व्यवसाय, नर्सरी व्यवस्थापन, बग मेकिंगकरीता 60 लक्ष रुपये असे एकूण 1.38 कोटी रुपये देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यांनी केले. यावेळी जि.प.सदस्या पावनी कल्यमवार, गजानन बेंजकीवार, पं.स. सदस्य राजेश्वर गोड्रावार, अभिषेक ठाकरे, अनुराधा वेट्टी, नैना मुद्दलवार यांच्यासह संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तसेच महिला बचत गटातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी