पालकमंत्र्यांच्या हस्ते योगा शिक्षकांचा सत्कार



      यवतमाळ, दि. 25 : आंतराष्ट्रीय योगा दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी योगाचे यशस्वी आयोजन करणा-या विविध संघटना, प्रशिक्षक आदींचा पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोल्हे लॉन येथे आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पी.बी. आडे, पतंजली योग समितीचे जिल्हाध्यक्ष संजय चाफले, भारत स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष दिनेश राठोड, आर्ट ऑफ लिव्हींगचे राजू पडगीलवार, शंतनू शेटे, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे महेश जोशी आदी उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय योगा ला जगमान्यता मिळवून दिली. गत चार वर्षांपासून आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे यशस्वी आयोजन विविध संघटनांच्या माध्यमातून होत आहे. नागरिकही आपल्या आरोग्याबाबत सजग झाल्यामुळे ते योगाकडे वळत आहे. ही ख-या अर्थाने योगा ला मिळालेली लोकमान्यता आहे. योगाचा आणखी प्रसार व्हावा तसेच नागरिक निरोगी, सुदृढ राहावा यासाठी शहरात भव्यदिव्य योगा प्रशिक्षण केंद्र उभारण्यास निधी उपलब्ध करून देऊ. मात्र त्यासाठी यात कार्यरत असलेल्या संघटनांनी जागेबाबतचा प्रस्ताव त्वरीत पाठवावा. वैशिष्टपूर्ण व ठोस तरतूद करून निधी देण्यात येईल. या केंद्राच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण होऊन समाजाला एक नवीन आयाम, व्यायाम मिळेल, असे पालकमंत्री म्हणाले.
            यावेळी संजय चाफले, दिनेश राठोड, राजू पडगीलवार, शंतनू शेटे, महेश जोशी, माया चव्हाण, अनिल ढेंगे यांच्यासह पतंजली योग समिती, भारत स्वाभीमान ट्रस्ट, आर्ट ऑफ लिव्हींग, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, क्रीडा भारती, शारीरीक शिक्षक संघटना, आरोग्य भारती आदी संघटनातील पुरुष, महिला योग शिक्षकांचा, कार्यकर्त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश जोशी यांनी केले. संचालन राजू पडगीलवार यांनी तर आभार शंतनू शेटे यांनी मानले. कार्यक्रमाला योगशिक्षक, प्रशिक्षक, विविध संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी