राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात 28 बालकांची विनामूल्य शस्त्रक्रिया करणार
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात 28 बालकांची विनामूल्य शस्त्रक्रिया करणार
यवतमाळ, दि. 24 (जिमाका): राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत शिवनेरी बाल रूग्णालय व कार्डियाक सेंटर येथे २ डी ईको तपासणी शिबिरात ० ते १८ वयोगटातील एकूण ७९ बालके व विद्यार्थ्यांची हृदयरोग तपासणी करण्यात आली. त्यात एकूण २८ विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे आढळल्यावरून या सर्व विद्यार्थ्यांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून विनामूल्य हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे बालहृदयरोग तज्ञ डॉ. शंतनू गोमासे (कार्डियोलॉजिस्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करण्यात आली. तपासणीतून या शिबिरास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश मांडण व डॉ. अनिल आखरे (बालरोग तज्ञ) आदी उपस्थित होते. तसेच आरबीएसके जिल्हा पर्यवेक्षक कृणाल पिसोळे, सांख्यिकी अन्वेषक बळीराम राठोड व आरबीएसकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
जिल्ह्यात अंगणवाडी स्तरावरील ० ते ६ वयोगटातील बालके तसेच शासकीय व निमशासकीय शाळांमधील ७ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. तपासणीदरम्यान आढळणाऱ्या संशयित आजारांवर वेळेवर सेवा देऊन योग्य उपचार उपलब्ध करून दिले जातात. जिल्ह्यात एकूण ४३ आरबीएसके पथकांमार्फत ही तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, प्रत्येक पथकामध्ये एक पुरुष व एक महिला वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माण अधिकारी व एक परिचारिका यांचा समावेश आहे.
000000

Comments
Post a Comment