विधी संघर्षग्रस्त बालकांना व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन
विधी संघर्षग्रस्त बालकांना व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन
यवतमाळ, दि. 24 (जिमाका): विधी संघर्षग्रस्त बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि बाल न्याय मंडळ, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'व्यवसाय प्रशिक्षण मार्गदर्शन कार्यशाळा' आयोजित करण्यात आली होती. शासकीय निरीक्षण गृह व बाल गृह येथे ही कार्यशाळा सोमवारी झाली.
बाल न्याय मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकारी श्रीमती शर्वरी जोशी यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विधी संघर्षग्रस्त बालकांचे पुनर्वसन होणे काळाची गरज आहे. "स्वावलंबी होणे हाच सन्मानाने जगण्याचा एकमेव मार्ग आहे," असे प्रतिपादन श्रीमती जोशी यांनी यावेळी केले.
व्यावसायिक अभ्यासक्रम आणि कर्ज सुविधांची माहिती आरएसईटीआय संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक दीपक तिवारी यांनी बालकांना उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली. केवळ प्रशिक्षणच नव्हे, तर स्वतःचा लघु उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांमार्फत कर्ज कसे उपलब्ध होऊ शकते, यावरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आर्थिक प्रगती करणाऱ्या एका बालकाचा सत्कार करण्यात आला. त्याने मनोगतातून आपल्या संघर्षाचा आणि यशाचा प्रवास मांडला.
कार्यशाळेत केवळ व्यावसायिक मार्गदर्शनच नाही, तर सामाजिक विषयावरही प्रकाश टाकण्यात आला. समाजातील विघातक बालविवाह प्रथेचे दुष्परिणाम सांगून, बालविवाह रोखण्याबाबत सर्व उपस्थितांना शपथ देण्यात आली.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री. देवेंद्र राजूरकर, परिविक्षा अधिकारी श्री. रविंद्र गजभिये, श्रीमती कडू, बाल न्याय मंडळाच्या सदस्या श्रीमती काजल कावरे, विधी अधिकारी महेश हळदे आणि अधीक्षक गजानन जुमळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रीतेश कराळे यांनी केले, सूत्रसंचालन समुपदेशक श्रीमती पूजा राठोड यांनी केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विशाल जाधव यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आभार विष्णू होडेकर यांनी मानले. राजू भगत, काजल कावरे महेश हळदे व चमूने विशेष परिश्रम घेतले.
00000
Comments
Post a Comment