नियोजित बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनास यश
नियोजित बालविवाह थांबविण्यात जिल्हा प्रशासनास यश
यवतमाळ, दि. 24 (जिमाका): राळेगाव तालुक्यात गोपालनगर परिसरात होऊ घातलेले दोन बालविवाह जिल्हा प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप करून यशस्वीपणे थांबविले. दिनांक २३ डिसेंबर रोजी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कार्यवाही करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार दोन बालकांचे वेगवेगळ्या ठिकाणी विवाह होणार होते. अंगणवाडी सेविकेकडील नोंदींच्या आधारे दोन्ही बालकांचे वय १६ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. बालविवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ नुसार बालिकेसाठी किमान १८ वर्षे व बालकासाठी २१ वर्षे वय आवश्यक असल्याने सदर विवाह बालविवाह ठरत असल्याचे निदर्शनास आले. जिल्हा चाईल्ड हेल्पलाईन यवतमाळचे केसवर्कर शुभम दत्ता कोंडलवार व अश्विनी दिलीप नासरे यांनी गाव बाल संरक्षण समिती, अंगणवाडी सेविका सरला आडे, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच तसेच राळेगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर बालविवाह तत्काळ थांबविला.
कार्यवाहीदरम्यान पालकांना बालविवाहाचे दुष्परिणाम व कायदेशीर परिणाम समजावून सांगण्यात आले. पालकांनी बालिकेचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करण्याबाबत लेखी हमी दिली असून त्यांना बालकल्याण समिती, यवतमाळ यांच्यासमोर दि. २४ डिसेंबर रोजी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. ही कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विशाल जाधव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. विठाळकर व चाईल्ड हेल्पलाईन यवतमाळचे प्रकल्प समन्वयक फाल्गुन पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
00000
Comments
Post a Comment