बालविवाहमुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांचा निर्धार डॉ.नंदुरकर विद्यालयात जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
यवतमाळ, दि. 18 (जिमाका): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, व डॉ. नंदुरकर विद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६ डिसेंबर रोजी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ व बाल विवाह मुक्त भारत या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या न्युनतम कार्यक्रम २०२५ अंतर्गत, शेखर चु. मुनघाटे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती तृप्ती आसवा, सहाय्यक लोक अभिरक्षक,या उपस्थित होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती माधुरी कोटेवार (चौधरी), जिल्हा समन्वयक, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्योती प्रमोद बावीसकर, मुख्याध्यापिका, डॉ. नंदुरकर विद्यालय तसेच सुहासिनी संदीप गायकवाड, सहाय्यक शिक्षिका यांची प्रमुख उपस्थिती होती.
माधुरी कोटेवार यांनी पोक्सो कायदा, बाल विवाह मुक्त भारत अभियान तसेच सोशल मीडियाच्या गैरवापराविषयी सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यात घडलेल्या सत्य घटनांची उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थिनींना सोशल मीडियावर चुकीचे फोटो-व्हिडिओ शेअर करणे, सायबर बुलिंग, अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या धमक्या यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. तसेच पोक्सो कायद्यातील जामीनपात्र व अजामीनपात्र गुन्ह्यांमधील फरक स्पष्ट करून, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ शिक्षक, पालक किंवा पोलिसांना कळवण्याचे निर्देश दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय तृप्ती आसवा यांनी स्पर्शामागील हेतूचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी अपराधासमोर मौन न बाळगता धाडसाने आवाज उठवावा, असे आवाहन केले. बालकांच्या संरक्षणासाठी उपलब्ध योजना, सुविधा, हेल्पलाइन क्रमांक व तक्रार नोंदवण्याच्या पद्धतींची माहिती त्यांनी दिली. शाळा व महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही देण्यात आली.
कार्यक्रमात ज्योती प्रमोद बावीसकर यांनी विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण व भावनिक नाते जपण्याबाबत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सुहासिनी संदीप गायकवाड यांनी केले. या कायदेविषयक शिबिरास विद्यालयातील शिक्षिका, महिला कर्मचारी वर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
000000

Comments
Post a Comment