जागतिक दिव्यांग दिनी कायदेविषयक मार्गदर्शन
यवतमाळ, दि. 3 (जिमाका): मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर सी. मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व नवजिवन गतिमंद विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर "दिव्यांग दिन" निमित्त नवजिवन गतिमंद विद्यालय, यवतमाळ येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिपक एच. दाभाडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी भूषविले. प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन श्रीमती मंगला मून, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांनी केले. तसेच श्री मुपारी, महल्ले, केशरवार, सुजित, श्रीकांत राठोड आणि शेख रफिक इब्राहिम, अध्यक्ष नवजिवन गतिमंद विद्यालय हे मान्यवरही उपस्थित होते.
कार्यक्रमातील प्रमुख मार्गदर्शक वक्त्या श्रीमती मंगला मून यांनी समाजात जसे इतर व्यक्तीकडे पाहिले जाते तसेच सन्मानाने मतिमंद मुलांकडेही पाहिले पाहिजे, असे आवर्जून सांगितले. गतिमंद बालकांसाठी शासनाकडून उपलब्ध विविध सुविधांची माहिती देत त्यांनी दिव्यांग अधिनियम २०१६ मधील महत्त्वपूर्ण तरतुदी स्पष्ट केल्या. तसेच शाळांमध्ये दिव्यांग मुलांना चांगला स्पर्शवाईट स्पर्श तसेच पोक्सो कायदा विषयक धडे देऊन त्यांना जागृत करणे ही शिक्षकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष दिपक एच. दाभाडे यांनी पालकांना मार्गदर्शन करताना दिव्यांग मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे तसेच त्यांच्या कला व कौशल्याला वाव देण्याचे आवाहन केले. शिक्षण, राहण्याची व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधांसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विविध मोफत योजनांची माहिती त्यांनी दिली. भारतीय राज्यघटनेने दिलेले समान हक्क व संधी दिव्यांग मुलांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाज, शिक्षक आणि संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास नवजिवन गतिमंद विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000
Comments
Post a Comment