आदर्श गाव योजना जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषी विभागाच्या कामांचा आढावा
यवतमाळ, दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या आदर्श गाव योजनेअंतर्गत कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती, प्रगती, येणाऱ्या अडचणी तसेच पुढील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभागांचे प्रतिनिधी तसेच कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आदर्श गाव योजनेत कृषी विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या.
आधुनिक शेती पद्धती, मृदसंधारण, पाण्याचा कार्यक्षम वापर, पीक विविधीकरण, सेंद्रिय शेती तसेच शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच योजनांचा थेट लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून आदर्श गावांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
योजनेतील कामे गुणवत्तापूर्ण असावीत, ग्रामस्तरावर लोकसहभाग वाढवावा आणि विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
आदर्श गाव योजना प्रभावीपणे राबवून गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभाग संयुक्तपणे काम करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
000000
Comments
Post a Comment