ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी अधिक सजग होण्याची गरज बळीराजा चेतनाभवनात ग्राहकांना मार्गदर्शन
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी अधिक सजग होण्याची गरज
बळीराजा चेतनाभवनात ग्राहकांना मार्गदर्शन
यवतमाळ, दि. 24 (जिमाका): समाजजीवनात डिजीटल व्यवहारांचे प्रमाण वाढले असून, ते आत्मसात करताना ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी अधिकाधिक सजग होण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रीय ग्राहकदिन कार्यक्रमात विविध मान्यवरांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बळीराजा चेतनाभवनात कार्यक्रम झाला. अन्न सुरक्षा अधिकारी अमितकुमार अपलप, अ. भा. ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. नारायणराव मेहरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र निमोदिया, अ. भा. ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष अभिजित पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश तायडे, पोलीस अंमलदार अविनाश सहारे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहायक व्यवस्थापक अक्षय जयस्वाल आदी उपस्थित होते.
जिल्हा सायबर सेलतर्फे सपोनि श्री. तायडे यांनी ऑनलाईन गुन्ह्यांचे स्वरूप व दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, 2025 मधील आकडेवारीनुसार सायबर गुन्ह्यांमुळे देशाचे 20 हजार कोटी रू. चे नुकसान झाले आहे. सायबर गुन्हेगारी रोखणे हे देशापुढील मोठे आव्हान आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकाधिक सजग होणे आवश्यक आहे. ग्राहकांचे हक्क, डिजीटल युगात घ्यावयाची दक्षता, कायदेशीर तरतुदी याविषयी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
ग्राहकांच्या प्रबोधनासाठी विविध विभागांच्या सहकार्याने मार्गदर्शनपर प्रदर्शनही यावेळी भरविण्यात आले होते. त्यात अन्न व औषध प्रशासन, वैधमापन शास्त्र विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, भारत संचार निगम लि., नितीन गॅस एजन्सी, स्टेट बँक ऑफ इंडिया, कृषी विभाग यांच्या कक्षांचा समावेश होता. जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. छाया गुधाणे यांनी सूत्रसंचालन केले. सीमा दोंदल यांनी आभार मानले. निरीक्षण अधिकारी मिथुन ठाकरे व शुभांगी कुंभेकर यांनी परिश्रम घेतले.
000000



Comments
Post a Comment