“माझी लाडकी बहिण” योजना केवायसी व मोबाइल लिंकिंगसाठी आयपीपीबी मार्फत जिल्हास्तरीय उपक्रम लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण करून घ्यावी - जिल्हाधिकारी विकास मीना

यवतमाळ, दि.5 (जिमाका) : ‘माझी लाडकी बहिण’ योजनेच्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी केवायसी, तसेच आधार मोबाईल लिंकिंग त्वरित पूर्ण करावे. तसेच महिलांसाठी कमी प्रीमियममध्ये उपलब्ध संरक्षण योजनांचा लाभ घेण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे केवायसी व आधार जोडणी जलद गतीने पूर्ण करण्यासाठी बैठक जिल्हाधिकारी यांच्या दालनात संपन्न झाली. इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेतर्फे वरिष्ठ शाखा प्रबंधक चित्रसेन बोदिले आणि प्रबंधक अमोल रंगारी उपस्थित होते. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेतर्फे (IPPB) जिल्ह्यातील सर्व पोस्टमन तथा ग्रामीण डाक सेवक ह्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना केवायसी व मोबाईल क्रमांक जोडणी करण्यासाठी मिशन मोडवर संपूर्ण सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे केवायसी कामकाज वेगाने पूर्ण करण्यास मोठी मदत होणार आहे. पोस्ट बँकेतर्फे महिलांसाठी उपलब्ध असलेल्या नारी सुरक्षा कर्करोग कव्हर पॉलिसीमध्ये कोणत्याही प्रकारच्या कर्करोगासाठी रुपये 1,00,000 पर्यंत कव्हर तसेच अपघात विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना (PMJJBY) आणि इतर संरक्षण योजनांची माहिती देखील यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील गरजू नागरिकांना योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आदेश दिले. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस