कामांच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता : कायदेविषयक शिबिरातून मार्गदर्शन
कामांच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता : कायदेविषयक शिबिरातून मार्गदर्शन
यवतमाळ, दि. 24 (जिमाका): जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महिलांच्या नोकरी किंवा कामांच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी कायदेविषयक शिबिर सोमवारी बळीराजा चेतना भवनात झाले.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा प्राधिकरणाचे अध्यक्ष शेखर चु. मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात प्राधिकरणाचे सचिव दिपक एच. दाभाडे यांच्या पुढाकाराने घेण्यात हे शिबीर झाले. उपजिल्हाधिकारी पूनम भिला अहिरे अध्यक्षस्थानी होत्या. अभिषेक मेमोरिअल फौंडेशनच्या प्रा. डॉ. सुप्रभा यादगीरवार यांनी कायद्यातील तरतुदींबाबत सविस्तर माहिती दिली.
“कामाच्या ठिकाणी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, प्रतिबंध व निवारण अधिनियम, २०१३ विषयी माहिती देण्यात आली. या कायद्याअंतर्गत लैंगिक छळाची व्याख्या, तक्रार समिती स्थापन करण्याची जबाबदारी, तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, गोपनीयता व संरक्षणात्मक तरतुदी याविषयी उपस्थितांना अवगत करून देण्यात आले. महिलांना सुरक्षित, सन्मानजनक व समतावादी कार्य वातावरण मिळावे हा या कायद्याचा मुख्य उद्देश असल्याचे श्रीमती यादगीरवार म्हणाल्या.
महिलांप्रती संवेदनशीलता व पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज असल्याचे श्रीमती अहिरे यांनी सांगितले. महिलांनी आपले हक्क जाणून घ्यावेत व अन्यायाविरोधात सजग राहावे, असे आवाहन त्यांनी केले. अव्वल कारकून विभा तुकाराम घोडे यांनी सूत्रसंचालन केले.
000000
Comments
Post a Comment