जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर
यवतमाळ, दि. 4 (जिमाका): राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ नगरपरिषद, तसेच वणी न. प. मधील प्रभाग क्र.14-क, दिग्रसमधील प्रभाग क्र.2-ब,5-ब,व 10-ब आणि पांढरकवडा मधील प्रभाग क्र.8-अ व 11-ब या नगरपरिषदांच्या काही प्रभागांसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले. सुधारित निवडणूक कार्यक्रमाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तसेच संबंधित नगरपरिषदांच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि सूचना फलकावर आज प्रसिध्द करण्यात आली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत १० डिसेंबर २०२५ ही निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदान २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घेण्यात येईल.
निवडणूक निर्णय अधिका-यांच्या नियुक्त्या
संबंधित नगरपरिषदांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपरिषद यवतमाळसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एसडीओ गोपाळ देशपांडे, तसेच सहायक निवडणूक अधिकारी म्हणून न. प. मुख्याधिकारी शुभम क्यातमवार आणि अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार योगेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वणी नगरपरिषदेतील संबंधित प्रभागांच्या निवडणूक एसडीओ नितीनकुमार हिंगोले हे निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी सचिन गाडे हे सहायक अधिकारी म्हणून काम पाहतील.
दिग्रस नगरपरिषदेतील संबंधित प्रभागांच्या निवडणूकीसाठी एसडीओ विजय सूर्यवंशी हे ‘आरओ’ म्हणून, तसेच तहसीलदार मयुर राऊत हे सहायक अधिकारी म्हणून आणि मुख्याधिकारी गिरीश पारेकर हे अति. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील.
पांढरकवडा नगरपरिषदेतील संबंधित प्रभागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन हे काम पाहतील. मुख्याधिकारी शशिकांत बाबर हे सहा. अधिकारी म्हणून, तसेच तहसीलदार राजेंद्र इंगळे हे अतिरिक्त सहा. निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील.
000000
Comments
Post a Comment