पाणलोट क्षेत्र विकासासाठी महा प्रकल्प राज्यातील 26 तालुक्यांत प्रकल्प
यवतमाळ, दि. १२ : ॲक्सिस बँक फौडेंशन, भारत रूरल लाइव्हलीहूड फौंडेशनतर्फे मनरेगाशी सांगड घालून राज्यातील यवतमाळ,चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नांदेड या पाच जिल्ह्यातील 26 तालुक्यांमध्ये ‘हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट’ राबविण्यात येत आहे. त्याद्वारे 878 लघु पाणलोटक्षेत्रे विकसित करण्यात येणार आहेत. त्याचा लाभ 4.39 लक्ष हे. क्षेत्राला होणार आहे.
ग्रामपंचायतींना कामांचे नियोजन, संनियंत्रण व अंमलबजावणी यासाठी सहयोग करण्यासाठी सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेनची निवड करण्यात आली आहे. एक सोसायटी दोन तालुक्यात काम करणार आहे.
कमीत कमी एक लक्ष शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणे, 1.77 लक्ष हे. शेतीक्षेत्राला सिंचन पुरविणे, बहुविध पीक प्रणालीला प्रोत्साहन देणे, प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे, मनरेगाच्या निधीतून टिकाऊ व उत्पादक संसाधनांची निर्मिती करणे ही या प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत.
जीआयएस प्रणालीच्या मदतीने पाणलोट क्षेत्र निश्चित करण्यात आले असून तालुकानिहाय ग्रामपंचायत, गाव, जीआयएस आधारित सविस्तर प्रकल्प आराखडा, पाणलोटांचे एकूण भौगोलीक क्षेत्र आदी बाबींची निश्चित करण्यात आल्या आहेत.
सध्या निवडलेल्या पाणलोट क्षेत्र, गावांमध्ये जीआयएस आधारित सविस्तर कृती आराखडा तयार करण्याकरिता सहभागी ग्रामीण मूल्यांकन करणे, शिवारफेरी करणे, विविध योजनेकरिता शेतकरी यांची निवड करणे आणि मोबाईल अॅपद्वारे शेतकरी/लाभार्थी निवड व पाणलोट क्षेत्र सर्वे या प्रकारची कामे सुरू आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी, मारेगाव, कळंब, केळापूर, आर्णी, घाटंजी तालुक्यांचा समावेश आहे.
०००
Comments
Post a Comment