२४ जानेवारीपूर्वी ई-पीक पाहणी नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प रब्बी हंगाम साठी (ई-पीक पाहणी डी सी एस) उपक्रमाची सुरुवात १० डिसेंबर २०२५ पासून करण्यात आलेली आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी आपल्या ७/१२ उताऱ्यावर पीक पेरा स्वतः अँड्रॉइड मोबाईलद्वारे नोंदणी कराची आहे. शेतकरी स्तरावर पीक पाहणीसाठी २४ जानेवारी ही अंतिम मुदत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार ५७०.३८ हेक्टर आर क्षेत्रावर पीक पेरा असून, एकूण ५लक्ष ६७हजार ५३६ मालक प्लॉटपैकी केवळ ३४ हजार ८०१ प्लॉटवर शेतकऱ्यांनी डी एस सी व्हर्जन 4.0.5 या मोबाईल अॅपद्वारे ई-पीक पाहणीची नोंद केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत फक्त ६.१३ टक्के प्लॉटवरच ई-पीक पाहणीची नोंदणी झालेली आहे.
उर्वरित सर्व शेतकरी बांधवांनी तातडीने ई-पीक पाहणी अॅपद्वारे आपल्या पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ई-पीक पाहणीसाठी अँड्रॉइड मोबाईल आवश्यक असून, संबंधित अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यापूर्वी गुगल क्रोम अपडेट करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी थेट शेत बांधावर जाऊन पीक नोंदणी करून माहिती अपलोड करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल उपलब्ध नाही किंवा अॅप वापरण्यात अडचण येत असेल, त्यांनी गावचे तलाठी, कोतवाल, नियुक्त सहायक, तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्या मदतीने ई-पीक पाहणीची नोंद करून घ्यावी. अॅप संदर्भात कोणतीही अडचण असल्यास संबंधित अधिकारी किंवा नियुक्त सहायक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ई-पीक पाहणीची नोंदणी न केल्यास संबंधित ७/१२ उताऱ्यावर पीक पेरा कोरा राहील, जो नंतर भरता येणार नाही. त्यामुळे पीक विमा, शासकीय अनुदान व इतर लाभ मिळवताना अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी पीक विमा मिळवण्यासाठी ७/१२ वर अचूक पीक नोंद असणे अनिवार्य आहे.सर्व शेतकरी बांधवांनी २४ जानेवारी पूर्वी अनिवार्यपणे ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment