सत्य, सहिष्णुता आणि त्यागाचा दीपस्तंभ : गुरु तेग बहादुर साहिब

सत्य, सहिष्णुता आणि त्यागाचा दीपस्तंभ : गुरु तेग बहादुर साहिब शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिब जी (एप्रिल 1621 – नोव्हेंबर 1675) यांनी अन्याय, धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात निर्भयपणे लढा देत त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. सत्य, धर्म, सहिष्णुता आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानामुळे त्यांना ‘हिंद दी चादर’ म्हणून गौरविण्यात आले. अमृतसर येथे गुरु हरगोबिंद साहिब व माता नानकी देवी यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. मूळ नाव त्यागमल असलेल्या गुरुजींना बालपणीच्या शौर्यामुळे ‘तेग बहादुर’ हे नाव प्राप्त झाले. ते अत्यंत शांत, ध्यानशील व संयमी होते. सांसारिक वैभवाचा त्याग करून त्यांनी आनंदपूर साहिब येथे साधना व सेवेमध्ये जीवन व्यतीत केले. 1664 मध्ये त्यांना गुरु पदवी प्राप्त झाली. धार्मिक अत्याचार व जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली व धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांनी बलिदान पत्करले. दिल्लीतील चांदणी चौक येथे कैदेत असतानाही त्यांनी संयम व ध्यानाचा मार्ग सोडला नाही. 1675 साली त्यांनी मानवाधिकार व धर्मस्वातंत्र्यासाठी शहिदी पत्करली. श्री गुरु तेग बहादुर साहिब यांनी सत्य, वैराग्य, करुणा व निर्भयतेचा संदेश दिला. त्यांच्या 57 शबद व 57 सलोक गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट असून जीवनाचे गूढ तत्त्वज्ञान व्यक्त करतात. “जो नर दुःख में दुःख नहीं मानें…” हा श्लोक समता व आत्मज्ञानाचे सार सांगतो. त्यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागातर्फे व राज्यस्तरीय समितीच्या वतीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. 7 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या समागम वर्षातील मुख्य कार्यक्रम 24 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, या माध्यमातून गुरु तेग बहादुर साहिब यांच्या धर्मरक्षण, सहिष्णुता व मानवतेचा संदेश सर्वदूर पोहोचविला जाणार आहे. राज्यातून सुमारे 10 लाखांहून भाविक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. - जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस