योग्य नियोजनातून विविध उपक्रम राबवून नांदेड येथील कार्यक्रमात समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती राहावी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

धाराशिव,दि.२२ जानेवारी (जिमाका) “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचे बलिदान संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी असून,त्यांच्या सर्व धर्मांप्रती असलेल्या समानतेच्या भावनेचा आणि मानवतेसाठी केलेल्या त्यागाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.त्यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त योग्य नियोजनातून जिल्हाभर विविध उपक्रम राबवावेत तसेच दिनांक २४ व २५ जानेवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमात जिल्ह्यातील संबंधित समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती राहील,असे नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले. दिनांक २१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबंधित विभाग प्रमुख, तहसीलदार,गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांची हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत तसेच नांदेड येथील कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री.कुंभार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची ऑनलाईन उपस्थिती होती. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर व जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. जिल्हाधिकारी पुजार म्हणाले की, नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तालुकास्तरावर तहसीलदार,गटविकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्या बैठका घेण्यात याव्यात.जिल्ह्यातील शाळा,आश्रमशाळा व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम आयोजित करावेत.विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करावे तसेच गाव व शहरांमध्ये प्रभात फेरी काढावी.विद्यार्थ्यांना ‘सरताज’ यांचे गीत व माहितीपट दाखविण्यात यावेत.नांदेड येथील कार्यक्रमासाठी श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्याशी संबंधित सिख, बंजारा,सिकलकर,लबाना,सिंधी, मोहयाल,वाल्मिकी,उदासीन व भगत नामदेव (वारकरी) संप्रदायातील समाज बांधवांपैकी जिल्ह्यातील इच्छुक व्यक्तींची यादी तयार करण्यात यावी व त्यांना नांदेड येथील कार्यक्रमास नेण्याची योग्य व्यवस्था करावी.विशेषतः उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंजारा समाज बांधव असून,त्यांच्याशी संपर्क साधून गटविकास अधिकारी यांनी त्यांना नांदेड येथील कार्यक्रमासाठी प्रोत्साहित करावे,असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी सांगितले की,जिल्हा परिषदेच्या शाळा व विद्यालयांमध्ये गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत असून, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.या उपक्रमांची माहिती व छायाचित्रे संबंधित पोर्टलवर अपलोड करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी सांगितले की,उमरगा,लोहारा व तुळजापूर तालुक्यांतून जास्तीत जास्त नागरिक नांदेड येथील कार्यक्रमास उपस्थित राहतील,यासाठी नियोजन करण्यात यावे.जाणाऱ्यांसाठी वाहनांची व्यवस्था करावी तसेच इच्छुकांची यादी तयार करावी.या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना तालुकास्तरावर बोलावून बैठक घेऊन त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांचा सहभाग सुनिश्चित करावा,असे त्यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री.कुंभार यांनी सांगितले की,नांदेड येथील कार्यक्रमाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोक उपस्थित राहावेत,यासाठी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठका घेण्यात आल्या आहेत. शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांनी सांगितले की,जिल्हा,तालुका व गावस्तरावर विविध शाळा व विद्यालयांमध्ये स्पर्धा तसेच अन्य उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून,या स्पर्धा व उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्यात येत आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस