आपले सरकार सेवा केंद्र निवडीबाबत आक्षेपांवर ६ जानेवारीपासून सुनावणी
यवतमाळ,दि.2 (जिमाका) : यवतमाळ जिल्ह्यातील रिक्त ठिकाणी 'आपले सरकार सेवा केंद्र' स्थापन करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेअंतर्गत प्राप्त झालेल्या आक्षेप आणि तक्रार अर्जांवर तालुका स्तरावर सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. बाभुळगाव, यवतमाळ आणि आर्णी तालुक्यातील अर्जदारांनी या सुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शासनाच्या १७ मार्च २०२३ च्या निर्णयान्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, १४ ऑक्टोबर २०२५ रोजी पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील गुणांकनाबाबत आक्षेप किंवा तक्रारी असल्यास त्या ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत लेखी स्वरूपात मागविण्यात आल्या होत्या. या कालावधीत बाभुळगाव तालुक्यातून ७०, यवतमाळ तालुक्यातून ९७ आणि आर्णी तालुक्यातून २९ असे एकूण १९६ आक्षेप प्राप्त झाले आहेत.
या तक्रार अर्जांनुसार तालुका निहाय सुनावणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले असून बाभुळगाव तालुक्यातील तक्रार अर्जांवरील सुणावणी ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तर यवतमाळ तालुक्यातील सुणावणी ७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता तसेच आर्णी तालुक्यातील सुणावणी ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे घेण्यात येणार आहे. तरी संबंधित तक्रारदार अर्जदारांनी नमूद केलेल्या तारखेला आणि वेळी उपविभागीय अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे स्वतः किंवा आपल्या वकिलासह उपस्थित राहावे. जे अर्जदार सुनावणीच्या वेळी गैरहजर राहतील, त्यांना या प्रकरणात काहीही म्हणायचे नाही असे गृहीत धरून नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment